ठाणे : एकीकडे भिवंडी आणि कल्याण लोकसभा मतदार संघावरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. अशातच श्रीकांत शिंदे यांची कल्याणमधून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीची उमेदवार व नेत्यांची आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ठाणे आणि कल्याण लोकसभेबाबत चर्चा केली.
त्यानंतर श्रीकांत शिंदेची उमेदवारी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केली. त्यामुळे ते कोणत्या चिन्हावर लढणार असा सवाल यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपस्थित केला. तसेच पुढील प्रचाराची रणनीती ठरविण्यात आली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बहुचर्चित अशा कल्याण लोकसभेसाठी महायुतीकडून श्रीकांत शिंदे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर शनिवारी दुपारी जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह महत्वाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये तासभर चर्चा झाली. यावेळी ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे, कल्याण लोकसभेच्या उमेदवार वैशाली दरेकर, युवसेना सचिव वरून सरदेसाई, केदार दिघे आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी करण्यात आलेल्या चर्चेत ठाणे आणि कल्याण लोकसभेची रणनिती ठरविण्यात आली असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तसेच कल्याणचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर ठाण्याचा उमेदवार कोण असेल त्याला कसे सामोरे जायचे, महायुतीमधून इच्छुक असलेल्यांपैकी कोणीही आला तरी त्यासाठी कशी रणनिती आखली जाउ शकते यावर देखील चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता, श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी कोणी जाहीर करावी हा त्यांचा प्रश्न आहे, मला असे वाटते की मुख्यमंत्र्यांनीच टाळले असेल की, माझ्या मुलाची उमेदवारी मी का जाहीर करावी म्हणून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना सांगितले असेल.
भाजपमध्ये अस्वस्थता आहे हे कोणीही नाकारू शकत नाही, त्याचे परिणाम आजच्या घडीला सांगू शकत नाही, ४४ दिवस अजून बाकी आहेत, ४४ दिवसानंतरच भविष्य सांगणे हे कोणत्या भविष्यकारालाही जमणार नसल्याचे देखील आव्हाड यांनी यावेळी सांगितले.