डोंबिवली : मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी भाजप शिवसेनेसोबत नव्हती. परंतु आता आपली महायुती आहे. त्यामुळे यावेळी मताधिक्याचा आकडा देखील तेवढाच राहिला पाहिजे. लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीत ही महायुती अशीच टिकली पाहिजे. तुम्ही सगळे निश्चित रहा. कल्याण लोकसभेत आमच्याकडून भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद दिली जाईल अशी ग्वाही देतो असे सांगत शिवसेना खासदार डॉ. शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात पदाधिकारी, कार्यकर्ते यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
कल्याण लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा रविवारी डोंबिवलीत पार पडला. महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितांशी संवाद साधत निवडणुकीच्या कामाला लागा असे आवाहन राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना केले आहे. यावेळी आमदार किसन कथोरे, प्रमोद हिंदुराव, जगन्नाथ शिंदे, गोपाळ लांडगे, राजेश मोरे, शशिकांत कांबळे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
खासदार शिंदे पुढे बोलताना म्हणाले, कल्याण लोकसभेची जागा रेकॉर्ड मताने जिंकायची आहे. या अगोदर भाजप आणि शिवसेना यांच्याकडून 2019 मध्ये मी लढलो होतो. तेव्हा राष्ट्रवादी बरोबर नव्हती पण तेव्हा देखील राष्ट्रवादीला 2 लाख 15 हजार मते पडली होती. तर मला 5 लाख 59 हजार मतं मिळाली होती. यांचं कॅल्क्युलेशन आता केल तर मला वाटतं साडेसात लाखापेक्षा जास्त मतं आपल्याला पडली पाहिजे. पण यावर आपल्याला थांबायचं नाही.
पहिल्या बैठका जेव्हा झाल्या तेव्हा आप्पांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात कल्याण लोकसभेमध्ये निधी आणला पण आमच्याही कार्यकर्त्यांना निधी मिळाला पाहिजे असे निवेदन दिले होते. त्यावेळी त्यांनी 20 कोटीच्या निधीची मागणी कार्यकर्त्यांसाठी केली होती.
मी क्षणाचा ही विलंब न लावता त्यावर मुख्यमंत्री शिंदे यांची सही घेऊन दुसऱ्याच दिवशी मी तो निधी त्यांना दिला होता. हे काम आपल्या सरकारचे आहे. म्हणून आपण देखील विश्वास ठेवा, आपण या महायुतीमध्ये सामील झालेले आहात. जसे भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे, त्यांना ताकद देण्याचं काम आम्ही करतो. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना ताकद देण्याचे काम हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री करतील. कारण ही सुरुवात आहे. हे लोकसभे पुरते मर्यादित नाही.
लोकसभा, विधानसभा किंवा महापालिका असेल ही महायुती पुढेही अशीच चालू राहिली पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे. जेणेकरून या जिल्ह्यामध्ये आपली ताकद दिसली पाहिजे. आपण तिघे एकत्र आहोत तर आपल्या समोर याठिकाणी कोणीही तग धरू शकत नाही असे म्हणत खासदार शिंदे यांनी महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येईल व विरोधक महायुती समोर तग धरू शकणार नाही असे म्हणत ठाकरे गटाला टोला लगावला.
श्रीकांत शिंदे यांचा आदित्य ठाकरे यांना सल्ला
ज्याची जी कुवत आहे त्याप्रमाणे त्यांनी वक्तव्य केले पाहिजे….आपल्या कुवती पेक्षा जास्त वक्तव्य झेपत नसेल तर करू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच जणांचे बळी घेतले तर ज्यांनी साथ दिली त्याचाच घात केला कल्याण लोकसभेची जागा देवेंद्र फडणवीस यांना जाहीर करावी लागली अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली होती. यावर खासदार श्रीकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया देत आदित्य ठाकरे यांना सल्ला दिला आहे.
