सर्व नागरिकांनी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन..

 

विरार :- शासनाच्या निर्देशानुसार वसई विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रात १४ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. स्वच्छता ही सेवा ही मोहीम म्हणजे सामुदायिक जबाबदारीची भावना वाढीस लावण्याच्या उद्देशाने आणि स्वच्छता हा प्रत्येकाच्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग आहे हा संदेश जनमानसात रुजविण्यासाठी, स्वतःहून श्रमदानात सहभागी होण्याचे नागरिकांना आवाहन आहे. यावर्षी स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता या संकल्पनेअंतर्गत सदर स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून सर्व नागरिकांनी या स्वच्छता श्रमदानात सक्रीय सहभाग घेऊन आपले शहर संपूर्ण स्वच्छ राखण्यात आपापल्यापरीने योगदान द्यावे असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.
स्वच्छता ही सेवा पंधरवडा अभियानांतर्गत १८ सप्टेंबरला जी महानगरपालिकेमार्फत ‘संपूर्ण स्वच्छता’ उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमांतर्गत शहरातील प्रचंड रहदारीच्या सार्वजनिक जागा, अधिक प्रमाणात कचरा होणारी ठिकाणे स्वच्छ करण्याची मोहीम घेण्यात येईल. यामध्ये रेल्वे स्थानक, स्काय वॉक, मुख्य रस्ते यांचा समावेश असेल.

२१ सप्टेंबरला सकाळी ०७.३० ते १०.३० पर्यंत राजोडी बीच, विरार पश्चिम येथे ‘स्वच्छता ही भागीदारी’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून या उपक्रमांतर्गत ‘एक पेड माँ के नाम’ (एक झाड आईच्या नावे) या मोहिमेच्या अनुषंगाने राजोडी बीच, विरार पश्चिम या ठिकाणच्या परिसरात वृक्ष लागवड करण्यात येईल व कचरा विलगीकरण व पुर्नाचक्रीकरणाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येईल. सदर दिवशी विविध ठिकाणी स्वच्छतेचे संदेश देणाऱ्या स्वच्छता रॅली काढण्यात येतील. तसेच राजोडी बीच, विरार पश्चिम येथे समुद्र किनारा स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून सदर ठिकाणी मानवी साखळीद्वारे स्वच्छतेविषयी जागरुकता करण्यात येईल. यावेळी उपस्थितांमार्फत स्वच्छतेची शपथही घेण्यात येईल. सदर कार्यक्रमास सर्व नागरिकांनी उपस्थित राहून स्वच्छता मोहिमेत आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

सर्वत्र ठिकाणी स्वच्छता करणारे आणि स्वच्छतेची कामे नियमित करणारे सफाई कर्मचारी मित्रांचे कल्याण हा या मोहिमेचा गाभा आहे. त्याअनुषंगाने २३ सप्टेंबर व २४ सप्टेंबर रोजी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळणे बाबत सफाई कर्मचाऱ्यांसाठी ‘सफाईमित्र सुरक्षा शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. २६ ते २८सप्टेंबर या कालावधीत ‘स्वच्छता ही भागीदारी’ हा उपक्रमा अंतर्गत स्वच्छ भारत सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात येणार असून यामध्ये टाकाऊ वस्तूंपासून कलात्मक वस्तूंची निर्मिती करणे बाबतचे प्रदर्शन भरविण्यात येईल तसेच खाद्य महोत्सवाचेही आयोजन वसई विरार महानगरपालिका मुख्यालय, यशवंतनगर, विरार (प.) येथे करण्यात येणार आहे. २७ सप्टेंबर रोजी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, बाजाराची ठिकाणे, उद्याने इ. ठिकाणी स्वच्छतेची शपथ घेण्यात येईल, या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होवून स्वच्छता शपथ घ्यावी असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

३० सप्टेंबर ते ०१ ऑक्टोबर या दिवसात ‘सफाईमित्र सुरक्षा शिबीर’ अंतर्गत मनपा सफाई कर्मचाऱ्यांचे व त्यांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी करणेसाठी मनपा आरोग्य विभागामार्फत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच लाडकी बहिण, आधारकार्ड व वैयक्तिक घरगुती शौचालय या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळवून देणेकरिता सफाई कामगार व त्यांच्या कुटूंबीय सदस्यांसाठी विशेष शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. ०२ ऑक्टोबर रोजी महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्याचे वाटप करण्यात येईल व उत्कृष्ठ काम केलेल्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करणेत येईल.

 

तरी सर्व नागरिकांनी स्वच्छता ही सेवा पंधरवडा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन महानगरपालिकेमार्फत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *