मुरबाड : शहरालगतच्या टेंभरे (बु.) गावचे जेष्ठ ग्रामस्थ नंदा गौरू गायकवाड यांचे गुरुवारी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, तीन जावई, दोन मुले, दोन पुतणी, दोन पुतणे व नऊ नातवंडे असा कटुंब असून तालुक्यात गायकवाड कुटुंबाचा मोठा गोतावळा असल्याने अंत्यविधी कार्याला मोठ्याप्रमाणात गर्दी होती. गावच्या वेशीवरील मुरबाडी नदीकाठी त्यांचा अंत्यविधी उरकल्यावर प्रेताची रक्षा नदीत न वाहता गायकवाड कुटुंबीयांनी सदर राखेतून पर्यावरण पूरक निर्णय घेतला.
एरवी गावच्या स्मशानभूमीत दहन केलेल्या प्रेताची राख स्मशानभूमीच्या शेजारील मुरबाडी नदीत सोडली जाते. सदर नदीचा पाणी गावात दैनंदिन कामांसाठी वापरला जातो. तसेच गावातील जनावरे दररोज नदीवर पाणी पिण्यासाठी येत असून गावातील महिलांची दिवसभर कपडे धुवण्यासाठी नदीवर गर्दी असते. त्यामुळे प्रेताच्या राखेने नदीपात्र दूषित होण्याची संभावना असल्याने ती राख व वाहिलेली हार, फुले गोणींमध्ये भरून गायकवाड कुटुंबीयांनी नदीपात्रात न टाकता नदीकाठी खड्डे करून उपस्थितीतांच्या हस्ते त्यात जांभूळ, आंबा, वड, पिंपळ, फणस, करंज, कदंब अशा विविध वृक्षांचे रोपण करण्यासाठी वापरली. त्यामुळे रोपांना खत मिळून निसर्ग संवर्धनासाठी हातभार लागेल व हीच बाबांना श्रद्धांजली ठरेल अशी भावना गायकवाड कटुंबियांनी व्यक्त केली.
तर या निर्णयाने जुन्या अनिष्ट प्रथांचा नायनाट होण्यास मदत होऊन तालुक्यातून एक सामाजिक तथा वैज्ञानिक प्रबोधनाचा संदेश सर्वत्र जाईल व एका नवीन नैसर्गिक विचारसरणीचा पाया मुरबाड तालुक्यातून रोवला जाईल, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.