ठाणे : मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ठाणे, कळवा, मुंब्रा परिसरातील १७ वर्षाखालील मुलींसाठी बुधवारपासून दरवर्षी प्रमाणे कळव्यातील खारलँड मैदानात निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वतीने दरवर्षी समर क्रिकेट कॅम्पचे आयोजन करण्यात येत असते. या कॅम्पच्या अनुषंगाने विविध संघांची निर्मिती करून क्रिकेट सामने आयोजित करण्यात येत असतात. या सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूची १७ वर्षाखालील संघात निवड होण्याची शक्यता असते. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अखत्यारीत असलेल्या विभागांमध्ये त्यासाठी निवड चाचणी घेण्यात येत असते. त्याचाच एक भाग म्हणून सालाबादप्रमाणे खारलँड मैदानात ही निवड चाचणी होणार आहे. या निवड चाचणीसाठी येणाऱ्या १७ वर्षाखालील क्रिकेटपटू मुलींना सर्व सुविधा अनिरुद्ध क्रिकेट अकादमीच्या वतीने पुरवण्यात येणार आहेत. ठाणे, कळवा, खारीगाव, विटावा, मुंब्रा, कौसा आदी भागातील १७ वर्षाखालील क्रिकेटपटू मुलींनी या निवड चाचणीत सहभागी व्हावे, असे आवाहन अनिरुद्ध क्रिकेट अकादमीने केले आहे.
