उल्हासनगर : कॅम्प नं-२, सोनार गल्लीत उभी राहिलेली अवैध ४ मजल्याची इमारतीवर आयुक्त विकास ढाकणे यांच्या आदेशानुसार पाडकाम कारवाई सुरू केली. अश्या अवैध बांधकामावर कारवाईचे संकेत सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिले आहे.

उल्हासनगरात विना परवाना अवैध बांधकामे सुरू असल्याच्या असंख्य तक्रारी आयुक्त विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांच्याकडे आल्या आहेत. त्यापैकी कॅम्प नं-२, सोनार गल्लीत उभी राहिलेल्या ४ मजली अवैध इमारतीवर पाडकाम कारवाई करण्याचे आदेश आयुक्त ढाकणे यांनी सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्यासह संबंधित प्रभाग अधिकाऱ्याला दिले. त्यानुसार सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली इमारतीवर पाडकाम कारवाई सुरू केली. अश्या अवैध बांधकामावर कारवाई करण्याची मागणी शहरातून होत आहे. कॅम्प नं-३ मधून वाहणाऱ्या वालधुनी नदी किनारी शांतीनगर व हिराघाट परिसरात अवैध शेड उभे राहिले असून गावडे शाळेजवळ अवैधपणे असंख्य खोल्या बांधण्यात येत आहे. तसेच महादेव कंपाऊंड व जुन्या डम्पिंग परिसरात अवैध बांधकामे उभे राहिल्याची चर्चा शहरात होत आहे.

उल्हासनगर म्हणजे अवैध बांधकामाचे शहर असे समीकरण झाले आहे. अवैध बांधकामाचा प्रश्न ऐरणीवर आल्यावर राज्य शासनाने अवैध बांधकामे नियमित करण्यासाठी विशेष अध्यादेश काढला. त्यामध्ये वेळोवेळी बदल करून अतीधोकादायक इमारतीचा प्रश्न समाविष्ट करण्यात आला. मात्र त्याची अंमलबजावणी होत नसल्याने, बांधकाम नियमित झालेल्या इमारतीची पुनर्बांधणी रखडली आहे. तर दुसरीकडे अवैध बांधकामावर नियंत्रण ठेवण्यात महापालिका अपयशी ठरल्याचा आरोप शहरातून होत आहे.

सोनार गल्लीतील शौचालये गेले कुठे?

कॅम्प नं-२, शिरू चौक ते सोनार गल्ली परिसरात चक्क महापालिका शौचालये भूमाफियांनी हडप करून अवैध बांधकामे उभी राहिली आहे. एकेकाळी सार्वजनिक शौचालयासाठी प्रसिद्ध असलेल्या सोनार गल्लीत अपवादात्मक एखादे शौचालये शिल्लक राहिले आहे. तसेच शौचालये हडप करून बांधलेल्या अवैध बांधकामावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *