माथेरान : स्व. संतोष पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माथेरान प्रेस क्लबच्या माध्यमातून गणेशोत्सव उत्कृष्ट सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती यामध्ये स्वप्नील कळंबे यांनी वीर हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जीवनपटाची आकर्षक सजावट साकारली होती त्यास प्रथम क्रमांक मिळाला असून सागर जोशी यांनी प्रास्तावित रोपवे बाबत उत्तम देखावा सादर केला होता त्यास द्वितीय क्रमांक मिळाला असून पतसंस्थेचे माजी सभापती हेमंत पवार यांनी सद्यस्थितीत मराठा आरक्षणाचा देखावा सादर केला होता त्यासाठी त्यांना तृतीय क्रमांक देण्यात आला आहे.
स्व.संतोष पवार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ माथेरान प्रेस क्लबच्या माध्यमातून या भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. येथील एका हॉटेलमध्ये पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. आयुष्यमान भारत मिशनचे प्रमुख ओमप्रकाश शेट्ये आणि मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या हस्ते विजेत्यांना रोख रक्कम तसेच सन्मान चिन्हे देऊन सन्मानित करण्यात आले याचबरोबर विविध क्षेत्रात कामगिरी बजावणारे मान्यवर यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करणारे शिक्षक योगेश जाधव आणि सुनील कदम यांचा तसेच सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ई रिक्षाचे जनक सुनील शिंदे,पुष्पा केरेकर आणि सह्याद्री मित्र आपत्कालीन सेवा संस्था यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष मनोज खेडकर, शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी, रायगड प्रेस क्लब अध्यक्ष मनोज खांबे, कर्जत प्रेस क्लबचे अध्यक्ष राहुल देशमुख यांसह अन्य पत्रकार मित्र आदी उपस्थित होते.
