क्रीडा विभागाकडून आवाहन

ठाणे : भारत देश युवांचा देश म्हणून ओळखला जात असून राष्ट्र निर्माणाच्या शाश्वत विकासाच्या मुख्य प्रवाहात युवांचे मोठे योगदान आहे. सामाजिक विकासाच्या प्रभावी माध्यमांची ओळख करून राष्ट्रीय व सामाजिक विकासाच्या प्रवाहात युवा शक्तीचा सहभाग असून तो वाढविणे आवश्यक आहे. यासाठी युवक कल्याण व क्रीडा विभाग यांनी दि.१८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या दरम्यान युवांच्या सहभागाने विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी दिली आहे.

“माय भारत” पोर्टलवर विविध युवा उपक्रम नोंदणी करणे, सेवाकार्य, स्वच्छता हा नवीन संकल्प-स्वच्छता पंधरवडा असे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. युवांचा राष्ट्र निर्माण कार्यात सहभाग वाढविणे, विकसित भारत करण्यामध्ये युवांनी योगदान देणे, याबाबत या पोर्टलवर युवांनी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी या https://mybharat.gov.in  संकेतस्थळावर  जिल्ह्यातील शाळा, कॉलेज व महाविद्यालय तसेच राष्ट्रीय छात्र सेना, स्काऊट व गाईड इ. विद्यार्थी व प्रशिक्षणार्थी यांनी नोंदणी करावयाची आहे. यामध्ये युवांनी केलेल्या विविध कार्याची माहिती संकलित होते. त्यांनी विविध वर्षामध्ये तसेच कार्यक्रमामध्ये घेतलेल्या सहभगाबाबत तपशिल एकत्रित होतो. यामुळे युवांनी केलेल्या कार्याची वैयक्तिक माहिती पोर्टलवर उपलब्ध होते.

ठाणे जिल्ह्यातील विद्यापीठ व महाविद्यालय स्तरावरील युवा व राष्ट्रीय सेवा योजनेचे छात्र यांनी नोंदणी “माय भारत” पोर्टल वर करण्यात यावी. १५ ते २९ वयोगटातील युवा विचारात घेता शाळा , कनिष्ठ महाविद्यालय  व महाविद्यालय यांनी नोंदणी करावी. उर्वरित माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, कोर्ट नाका, ठाणे  दूरध्वनी: ०२२-२५३६८७५५ येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *