६५० पदाधिकाऱ्यांचा भाजपात पक्षप्रवेश

मुंबई : बंद दाराआड महायुतीकडून मनसेला सोबत घेण्यासाठी चर्चा सुरु असतानाच आता दिवसाढवळ्या भाजपाने मनसेला मुंबईत खिंडार पाडले आहे. तब्बल ६५० पदाधिकाऱ्यांनी ‘मनसे’ राज ठाकरेंची साथ सोडत भाजपात दाखल होण्याचा निर्णय घेतलाय.

भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार व विधान परिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी यासाठी फिल्डींग लावल्याचे सुत्रांनी सांगितले.

मनसे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण मर्गज यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मनसेला जय महाराष्ट्र करणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे. मनसेमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश उपाध्यक्ष प्रविण मर्गज, विभाग अध्यक्ष बाबूभाई पिल्ले, दोन विभागसचिव, पाच उपविभाग अध्यक्ष महिला-पुरुष, दोन  उपसचिव, ११ महिला-पुरुष शाखाध्यक्ष, ८० महिलापुरुष उपशाखाध्यक्ष, २६ इतर सेलचे पदाधिकारी, गटाअध्यक्ष व राजदूत कार्यकर्ते असे एकूण ६५० पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

 राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या घडामोडींना दोन आठवड्यांपूर्वी वेग आले होते. स्वतः राज ठाकरेंनी दिल्ली गाठत अमित शाह यांची भेट देखील घेतली होती. मात्र, पुढे या चर्चा थंडावल्या होत्या. अशात शनिवारी शिंदे गटाचे नेते तथा आमदार संजय शिरसाट यांनी अचानक राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा देखील झाली. त्यामुळे राज ठाकरेंच्या महायुतीसोबत जाण्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. पण, आमच्या भेटीत अशी कोणतेही राजकीय चर्चा झाली नसल्याचं शिरसाट म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *