शिवसेना आमदार संजय गायकवाडांची तालीबानी भाषा
गायकवाडांविरोधात गुन्हा दाखल
राहुल गांधींविरोधातील वक्तव्य भोवलं
मुंबई : तालीबानी नेत्यांनाही लाजवेल अशी दंगलखोर भाषा वापरणे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना चांगलेच भोवले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधीची जीभ छाटणाऱ्यांना संजय गायकवाड यांनी ११ लाखांचे इनाम घोषित केले होते. त्याविरोधात आंदोलन करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना गायकवाड यांनी एकेकाला गाढून टाकीन अशी धमकी दिली होती. अखेर संजय गायकवाड यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरक्षणाविरोधात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळेच आपण त्यांची जीभ छाटण्यासाठी इनाम घोषित केले आहे. अशा गुन्हा दाखल करण्याला आपण घाबरत नाही अशी बेदरकार प्रतिक्रीया गायकवाड यांनी दिली.
महाराष्ट्रातील काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी संजय गायकवाड यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. अखेर या प्रकरणात संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय गायकवाड यांच्यावर भारतीय न्याय संहिता नुसार 192, 351 (२) , ३५२ (३), ३५२ ( ४) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर काँग्रेसने ठिय्या आंदोलन मागे घेतलं आहे.
“आम्ही गुन्ह्याची परवा कधी केली नाही. आरक्षणाला विरोध करणाऱ्याला धडा शिकवण्याकरता गुन्हा दाखल होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही. याला जर गुंडगिरी म्हणता असतील तर ही गुंडगिरी मला मान्य आहे”, अशी पहिली प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली.
“स्टेटमेंट मी केलं आहे. मीच माफी मागत नाही तर मुख्यमंत्री कशाला मागतील? मी माझ्या वक्तव्यावर ठाम आहे. मी आरक्षण संपवणाऱ्याबद्दल जे वक्तव्य केलं त्यावर ठाम आहे. काँग्रेसने ७० कोटी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे प्लानिंग केलं आहे. काँग्रेस पेक्षा मोठी आंदोलने आम्ही केली आहेत. आम्हाला देखील दहा-दहा हजार माणसं आणून आंदोलन करता येतील”, अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली.
“माझ्या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या कोणी कुत्र्याने घुसण्याचा प्रयत्न केला तर तिथेच गाडून टाकीन. तुम्ही फक्त रोडवर पाय ठेऊन दाखवा, तुम्हाला समजेल शिवसेना काय आहे. मी खरे बोलण्याचा निषेध करतात तर करा. जनता तुम्हाला मत पेटीतून उत्तर देईल. जे वक्तव्य केले ते माझे वैयक्तिक मत आहे”, असं संजय गायकवाड म्हणाले.
पंजा काय करेल हे कळणारही नाही
संजय गायकवाड, तोंडाला आवर घाला नाहीतर पंजा काय करेल हे कळणारही नाही. आधी तुमची लायकी आहे का संविधान आणि राहुल गांधींवर बोलायची? हे एकदा पाहा. सत्तेच्या माजात काहीही बरळू नका. नाहीतर निवडणुकीत घरचा रस्ता पक्का समजा. जनता यांना धडा शिकवणारच. मतदार घरचा रस्ता दाखवणारच, असे म्हणत नाना पटोले यांनी संजय गायकवाड यांच्यावर निशाणा साधला.
