डोंबिवली : पुणे येथील गोखले अर्थशास्त्र-राज्यशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून विख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांना हटविल्याने देशभरातील विद्वतजन, अर्थतज्ज्ञांकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. त्याच बरोबर डोंबिवलीतील विविध क्षेत्रातील नामवंतांनी, सामाजिक भावनेतून शिक्षण संस्था चालविणाऱ्या विद्यानिकेतन शाळेने या घटनेचा निषेध केला आहे.
डोंबिवलीतील उंबार्ली भागातील विद्यानिकेतन संस्था राज्यासह देशातील विविध घटना, डोंबिवली शहरातील नागरी समस्या या विषयांवर आपल्या शालेय बसच्या मागे फलक लावून त्या माध्यमातून आपली, समाजाची भावना व्यक्त करते. डोंबिवलीतील नागरिक या फलकाच्या माध्यमातून विचार मार्गदर्शनाचा लाभ घेते. आतापर्यंत डोंबिवली, कल्याणमधील खड्डे, काँक्रिट रस्ते, शहरातील नागरी समस्या अशा अनेक विषयांवर विद्यानिकेतन शाळेने जनजागृती मोहीम राबवली आहे.
पुणे येथील गोखले अर्थशास्त्र संस्थेच्या कुलगुरू पदावरून डॉ. अजित रानडे यांना हटविल्याने विद्यानिकेतन संस्थेने आपल्या शाळेच्या बसच्या मागे फलक लावून उपरोधिकपणे घडल्या घटनेचा निषेध आणि समाजाचे विचार प्रबोधन केले आहे. शाळेच्या बस मागील फलकावर विद्यानिकेतन संस्थेने म्हटले आहे, विव्दानांना या देशात महत्वच नाही. विद्वत्तेचे निकष काय आहेत. हे एकदा विश्वगुरू होऊ पाहणाऱ्या भारताने ठरवावेत. म्हणजे महाराष्ट्राला स्वयंघोषित सांस्कृतिक, शैक्षणिक राजधानी म्हणवून घेणाऱ्या, या राज्यातील विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे नगरीतील नामचिन गोखले अर्थशास्त्र संस्थेतून अच्युत्तम शैक्षणिक अहर्ता असणाऱ्या, भविष्यवेधी विचार करून संस्था सुधारणेत महत्वाचे योगदान देणाऱ्या, प्रसिध्दी विन्मुख, सज्जन अर्थतज्ज्ञाला पदमुक्त करण्याची हिम्मत बंदिस्त वर्गात मुलांना अर्थशास्त्र शिकविणाऱ्यांनी, त्यांच्या बोलवित्या धन्यांनी केली नसती, असे उपरोधिक बोल या फलकातून मांडण्यात आले आहेत.
शिक्षण क्षेत्रातील साचेबंद आणि ठोकळेबाज चौकटी मोडल्या नाहीतर भविष्यवेधी, उज्जवल शिक्षण पध्दतीची अपेक्षा करणे हे दिवास्वप्न ठरणार आहे, असे संकेत या शालेय बसवरील फलकातून देण्यात आले आहेत. विद्यानिकेतन शाळेच्या बस विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी डोंबिवलीत आल्या की त्या जागोजागी मुलांना उतरविण्यासाठी थांबत आहेत. त्यावेळी हा फलक वाचण्यासाठी पालक, नागरिकांची झुंबड उडत आहे.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *