आमदार सरनाईक यांच्या प्रयत्नाने मीरा भाईंदर स्वच्छ शहर मोहिमेसाठी राज्य सरकारकडून १५० कोटींचा निधी
अनिल ठाणेकर/अरविंद जोशी
भाईंदर : जनतेच्या सहभागामुळे स्वच्छ भारत – स्वच्छ महाराष्ट्र अभियानाचे रुपांतर एका राष्ट्रीय चळवळीत झाले आहे. या अभियानामुळे लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. त्याचाच अधिक विस्तार करून ओवळा माजिवडा विधानसभा मतदारसंघात ‘स्वच्छ ठाणे – मीरा भाईंदर’ ही स्वच्छ शहर मोहीम २ ऑक्टोबर गांधी जयंती पासून सुरु करीत आहोत , असे आज आमदार प्रताप सरनाईक यांनी जाहीर केले. मीरा भाईंदर शहरात नवीन आधुनिक टोगो वाहने , खत निर्मिती प्रकल्प तसेच प्रत्येक सोसायटीला ओला – सुका कचरा ठेवण्यासाठी डबे वाटप केले जाणार आहेत. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारकडून १५० कोटींचा निधी दिला आहे , अशी माहितीही आमदार सरनाईक यांनी दिली. आमदार सरनाईक यांच्या मतदारसंघातील प्रत्येक सोसायटी , इमारती , बैठ्या चाळींना चांगल्या दर्जाचे डस्टबिन्स वाटप सुरु केले जाणार आहे. मीरा भाईंदर शहरात ‘शून्य कचरा मोहीम’ राबवून शहर स्वच्छ – सुंदर करण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जाणार आहेत. लोकांच्या सक्रीय सहभागामुळेच ‘स्वच्छ सुंदर ठाणे – मीरा भाईंदर’चे हे स्वप्नही प्रत्यक्षात उतरेल याची मला ही मोहीम सुरु करताना खात्री आहे असेही आमदार प्रताप सरनाईक म्हणाले.
‘स्वच्छ सुंदर…आपले ठाणे – मीरा भाईंदर’ ही स्वच्छ शहर मोहीम २०२४ सुरु करण्याबाबत आज आमदार प्रताप सरनाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘स्वच्छ शहर मीरा भाईंदर’ मोहिमेची अंमलबजावणी होत असताना माझ्या मतदारसंघातील ठाणे आणि मीरा भाईंदर शहर स्वच्छ , सुंदर रहावे येथील हवामानाचा दर्जा चांगला रहावा व प्रदूषणमुक्त चांगले वातावरण सदैव रहावे यासाठी जे – जे प्रयत्न करता येतील ते मी प्रशासनाच्या मदतीने वेळोवेळी केले आहेत. पर्यावरणाच्या दृष्टीने सुरक्षित कायमस्वरुपी स्वच्छतेसाठी स्वस्त आणि योग्य आधुनिक तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देणे हेही सध्याच्या दिवसात आवश्यक बनले आहे. यासाठी आपल्या शहरात काही नवीन योजना व उपक्रम हाती घ्यायचे मी ठरवले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या स्वच्छ शहर मोहिमेसाठी ठाणे शहरास १५० कोटी व मीरा भाईंदर शहरास १५० कोटी असा एकूण ३०० कोटींचा निधी दिला आहे अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली. ते पुढे म्हणाले की , या शासकीय निधीतून शहरातील प्रत्येक हौसिंग सोसायटीला आपण ओला व सुका कचरा ठेवण्यासाठी चांगल्या दर्जाचे २ डबे (डस्टबिन्स) वाटप सुरु करणार आहोत. जेणेकरून हौसिंग सोसायट्या ओला व सुका कचऱ्याचे योग्य पद्धतीने वर्गीकरण करू शकतील आणि वर्गीकरण केलेला कचरा नंतर संकलित होईल. आमदार म्हणून मी शहरातील माझ्या मतदारसंघातील प्रत्येक हौसिंग सोसायट्यांना हे डबे देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे हौसिंग सोसायट्यांची वार्षिक आर्थिक बचतही होईल. सोसायट्याना कचऱ्याचे डबे देण्यासोबतच ओल्या कचऱ्याची समस्या पूर्णपणे कमी व्हावी यासाठी आधुनिक टोगो हे यंत्र वाहन खरेदी करण्यात आले आहे. ओला कचरा गोळा करून अत्याधुनिक टोगो वाहन शहरात फिरत असतानाच त्यात ओल्या कचऱ्यापासून खत बनविण्याचे काम करत राहील , अशी माहितीही आमदार सरनाईक यांनी दिली व टोगो वाहनाचे प्रात्यक्षिक ही यावेळी दाखवले. कचरा व्यवस्थापनाअभावी उद्भवणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी आता व्यापक प्रमाणावर सातत्याने प्रयत्न होणे आवश्यक आहे. यातील ओल्या कचऱ्याची समस्या पूर्णतः सुटावी या दृष्टीने ओल्या कचऱ्याचे रूपांतर खतात करणारे एक आधुनिक टोगो यंत्र वाहन तयार करून ते आपल्या शहरात आणण्यात आले आहे. ठाण्यासाठी २० व मीरा भाईंदर शहरासाठी २० टोगो व्हॅनची खरेदी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या टोगो व्हॅनचा मोठा फायदा होत आहे. ठाण्यात गेले ६ महिने यशस्वीपणे सुरु असलेली टोगो व्हॅनची अंमलबजावणी आता मीरा भाईंदरमध्ये सुरु होणार आहे , अशी माहितीही आमदार सरनाईक यांनी दिली.आमदार सरनाईक यांनी माहिती दिली की , चालता – फिरता कचऱ्यापासून खत निर्मिती करणारे टोगो हे जगातील या प्रकारचे पहिलेच यंत्र वाहन आहे. टोगो (towgo) अर्थात ट्रीटमेंट ऑफ द वेस्ट ऑन द गो.. अशी ही संकल्पना असून कचरा व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारी जागा, त्याचप्रमाणे कचऱ्यातून पसरणारी दुर्गंधी यासारख्या समस्यांवर हा एक सरळ व सोपा असा उपाय आहे. टोगो वाहन नैसर्गिक इंधनावर (CNG वर) चालत असल्याने आणि प्रक्रियेसाठी सौर ऊर्जेचा वापर करत असल्याने टोगो ही प्रदूषण विरहित आहे आणि निसर्गासाठी फारच सकारात्मक ठरत आहे. शहराच्या विविध भागात जाऊन टोगो कचरा गोळा करणार असल्याने कचऱ्याच्या ने – आण दरम्यान सांडणाऱ्या कचऱ्यातून पसरणारी घाण व दुर्गंधी यांचाही प्रश्न सुटणार आहे. टोगो ही ठिकठिकाणी जाऊन ओला कचरा गोळा करते. वाहन धावत असतानाच या टोगो मध्ये अवघ्या सात दिवसात या कचऱ्याचे रूपांतर खतात होते. ओल्या म्हणजे घनकचऱ्याचे खतात रूपांतर होण्यासाठी जरी सात दिवस लागत असले, तरीदेखील आपण या टोगो व्हॅन मध्ये दररोज कचरा टाकू शकतो आणि निर्माण होणारे कंपोस्ट खतही आपल्याला रोजच्या रोज मिळू शकते. यामुळे घरोघरी जाऊन कचरा गोळा करत असताना देखील खत निर्मितीसाठी लागणारी सर्व प्रक्रिया यात सुरूच असते. टोगो मधून निर्माण होणारे खत शहरातील उद्याने , रस्त्याच्या दुतर्फ़ा असलेली झाडे तसेच मोठ्या हौसिंग सोसायट्यांमधील उद्याने यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातूनही हे खत आपण नागरिकांना उपलब्ध करून देऊ शकतो असेही ते म्हणाले. या एका टोगो वाहनाची क्षमता दीड टन ओल्या कचऱ्यावर दररोज प्रक्रिया करण्याची आहे. सात दिवसात यात ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत होणार असले तरी दररोज दीड टन कचरा या वाहनात प्रक्रियेसाठी टाकू शकणार आहे. याचबरोबर शहरात ४ ठिकाणी खत बनविण्याचे स्वतंत्र प्रकल्पही प्रस्तावित करण्यात आले आहेत , अशी माहिती आमदारांनी दिली. ओला व सुका कचरा वर्गीकरण व सखोल स्वछता मोहिमेची सवय प्रत्येक सोसायटीला , प्रत्येक नागरिकाला लागली पाहिजे. यासाठी प्रत्येक बिल्डिंगला चांगल्या दर्जाचे डस्टबिन्स आम्ही वाटप करत आहोत. आपले शहर कायम स्वच्छ – सुंदर , आरोग्यदायी आणि प्रदूषणमुक्त , पर्यावरणस्नेही निरोगी वातावरण राहण्यासाठी , ‘सूक्ष्म कचरा व्यवस्थापन’ करणे आवश्यक आहे. ‘शून्य कचरा’ मोहीम ३६५ दिवस सुरु रहावी असे आम्हाला वाटत असले तरी शहरातील प्रत्येक नागरिकाने स्वच्छतेचे दूत बनून यात सहभाग घेतला पाहिजे. जे डबे आम्ही वाटप करणार आहोत त्याची देखभाल निगा सोसायटीने ठेवायची आहे. तर सार्वजनिक ठिकाणे , फुटपाथ , जिथे लोकांची गर्दी असते अशा ठिकाणीही कचरा टाकण्यासाठी डस्टबिन्स ठेवले जाणार आहेत , अशी माहिती आमदार सरनाईक यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘स्वच्छ शहर आपले ठाणे – मीरा भाईंदर’ ही मोहीम आम्ही सुरु केली आहे. २ ऑक्टोबर पासून ही मोहीम पूर्णपणे प्रत्येक प्रभागात सुरु होणार आहे. ओला व सुका कचरा वर्गीकरण करण्याबाबत शिवसेनेचे पदाधिकारी , कार्यकर्तेही प्रत्येक प्रभागात जाऊन जनजागृती करणार आहेत. आपले शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून पूर्ण प्रयत्न करीत आहोत. आता प्रत्येक नागरिकाने स्वच्छ शहरासाठी शपथबद्ध होऊन या मोहिमेला अधिक मजबुतीने साथ दिली पाहिजे. म्हणजे देशातील पहिल्या १० स्वच्छ-सुंदर शहरात आपल्या ठाणे , मीरा भाईंदरचे नाव घेतले जाईल त्याचवेळी ही मोहीम पूर्णपणे यशस्वी झाले असे आम्हास वाटेल असेही आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले.
०००००