अशोक गायकवाड

रत्नागिरी : निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक यंत्रणा आणि त्यातील प्रत्येकाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. मतदान प्रक्रीये दरम्यान अधिकाऱ्यांनी काय करावे आणि काय करु नये, या सुचनांचा काटेकोर अभ्यास करावा. त्यादृष्टीने सर्वांनी आपल्यावर सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. त्यासाठी निवडणूक प्रशिक्षण जबाबदारीने घेण्याचे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार मतदान प्रक्रियेमध्ये थेट सहभागी असणाऱ्या मतदान केंद्राध्यक्ष/मतदान अधिकारी यांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी आणि कुडाळ येथे आयोजित करण्यात आले होते. यामध्ये सावंतवाडी येथील बॅरिस्टर नाथ पै सभागृह तसेच कुडाळ येथे प्रशिक्षणासाठी उपस्थित झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांशी निवडणूक निर्णय अधिकारी सिंह आणि जिल्हा निवडणूक अधिकारी तथा सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी भेट देऊन संवाद साधला. तसेच त्यांच्या अडीअडचणी व अपेक्षाही जाणून घेतल्या. प्रशिक्षणानंतर त्यांनी सावंतवाडी येथील स्ट्रॉंग रूमची देखील पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीमती पद्मश्री बैनाडे, उपविभागीय अधिकारी सावंतवाडी हेमंत निकम, तहसिलदार श्रीधर पाटील, वेंगुर्ला तहसिलदार ओंकार ओतारी, दोडामार्ग तहसिलदार अमोल पोवार, अपर तहसिलदार मोनिका कांबळे, उपविभागीय अधिकारी कुडाळ, ऐश्वर्या काळुसे, कुडाळचे तहसिलदार विरसिंग वसावे आणि मालवणच्या तहसिलदार वर्षा झाल्टे यांच्यासह संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सिंह म्हणाले, आपल्यावर असलेली जबाबदारी ही खूप महत्त्वपूर्ण आहे. त्यादृष्टीने आवश्यक असलेल्या सर्व बाबी, पूरक साहित्य, त्याचा वापर, मतदान केंद्रावर घ्यावयाची आवश्यक खबरदारी या सर्व बाबी गतिमानतेने, अचूकपणे पार पाडण्याची जबाबदारी मतदान केंद्रातील अधिकारी, कर्मचारी यांची आहे. आपल्याला दिलेली जबाबदारी आणि काम अधिक चांगल्या प्रकारे पार पाडण्याच्या भूमिकेतून सर्वांनी या प्रशिक्षण कार्यक्रमांचा उपयोग करून घ्यावा. त्याचबरोबर प्रशिक्षणादरम्यान आपल्या मनात येणाऱ्या सर्व शंका व प्रश्न आपल्या प्रशिक्षकांना मनमोकळेपणाने विचारा आणि त्यांचे निराकरण करून घ्या असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *