जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खालावली आहे. सगेसोयरेच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करुन मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. जरांगेंना उपोषणाच्या चौथ्या दिवशी चालणं देखील मुश्कील झालं आहे. सहकाऱ्यांचा आधार घेत ते चालताना दिसत आहेत. मनोज जरांगे यांना थकवा जाणवतोय. ते स्टेज वरून खाली उतरताना ते अचानक खाली बसलेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांना उठता येत नव्हते. दरम्यान, सरकारकडून मनोज जरांगेंना कोणता प्रतिसाद मिळतोय का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
तिसऱ्या दिवशीच मनोज जरांगेची शुगर लेवल डाऊन झाली होती. शिवाय त्यांना थकवा जाणवत असल्याचेही डॉक्टरांनी सांगितले होते. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या वैद्यकीय पथकाने आज जरांगे यांची तपासणी केली होती. यावेळी त्यांना उपचार घेण्याची विनंती केली होती. मात्र मनोज जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला असल्याचं जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी सांगितले.
आजवर मराठा समाजाने सहकार्याचीच भूमिका घेतली आहे. एक वर्षापासून लढा सुरू आहे. लाखोंची जनता रस्त्यावर उतरल्याच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याच वाईट वाटायला पाहिजे, अशी प्रतिक्रिया म्हणून जरांगे यांनी दिली होती. मनोज जरांगेंचे सध्या सहावे उपोषण सुरु आहे. आपण सरकारला संधी देत असून आजवर कोणी काय दिल? यापेक्षा सत्तेत असून जनतेचा तुम्हाला फायदा करायचा नसेल तर तुम्हाला कोण सोडेल? असे सवाल मनोज जरांगे यांनी उपस्थित केले आहेत.