नांदेड जिल्ह्यातील माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर आणि त्यांच्या सूनबाई श्रीमती मीनल पाटील खतगावकर यांनी आज भाजपाला रामराम करीत काँग्रेस पक्षात अधिकृत प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या टिळक भवन कार्यालयात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस पक्षाचा गमछा घालून त्यांचं पक्षात स्वागत केलं.
मुंबई : क्राँग्रेसमधून बंड करून भाजपात दाखल झालेले माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांना आज जबर राजकीय झटका बसलाय. अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव खतगावकर ,त्यांच्या स्नुषा मीनलताई खतगावकर आणि माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांनी आज पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश करीत घरवापसी केलीय.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत हा पक्षप्रवेशाचा सोहळा पार पडला. यावेळी माजी आ. डी.पी.सावंत, आमदार मोहन हंबर्डे हजर होते. काँग्रेसमध्ये प्रवेस केल्यानंतर भास्करराव खतगावकर यांनी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचं म्हटलं. खतगावकर यांचा काँग्रेस प्रवेश भाजप आणि खासदार अशोक चव्हाण यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भास्करराव खतगावकर, मीनल खतगावकर यांचं काँग्रेसमध्ये स्वागत करत असल्याचं म्हटलं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. लोकसभेत नांदेडमध्ये प्रत्येकाची ताकद दिसली आहे. खतगावकर यांच्या प्रवेशानं काँग्रेसला बळ मिळेल. नांदेडमध्ये कुणाची काय ताकद होती हे लोकसभेत दिसलं आहे, असंही नाना पटोले म्हणाले. नांदेड जिल्ह्यात पक्ष प्रवेशाचा मोठा सोहळा पार पडेल, पुढील महिन्यातील पहिल्या आठवड्यात प्रवेशाचा मोठा सोहळा होईल, असंही नाना पटोले यांनी म्हटलं.
आता भाजपा प्रणित शिंदे सरकारला गळती सुरू झाली आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार स्पष्ट झालं असल्याचं नाना पटोले म्हणाले.
अशोक चव्हाण स्वत: असुरक्षित आहेत, ते सध्या तिकडे आहेत, त्यांनी तिकडे कायम राहावं, असा टोला नाना पटोले यांनी लगावला. भास्करराव खतगावकर यांनी नांदेडमध्ये तळागाळापासून काम केलेलं आहे, असंही नाना पटोले म्हणाले.