डहाणू : धाकटी डहाणू येथील ‘सागर सरिता’ नावाच्या मासेमारी बोटीला खोल समुद्रात एका भल्या मोठ्या मालवाहू जहाजाने पाठीमागून धडक दिल्याची घटना घडली.
वत्सला यशवंत मर्दे यांची सागर सरिता नावाची मासेमारी बोट शनिवारी रात्री आठच्या सुमारास खोल समुद्रात मासेमारी करीत असताना, तिला अचानक गुजरात बाजूकडे जाणाऱ्या एका भल्या मोठ्या मालवाहतूक जहाजाने धडक दिली.
यामध्ये बोटीच्या पंख्याजवळ भगदाड पडल्याने बोटीत पाणी घुसू लागले. या वेळी बोटीतील नऊ खलाशानी प्रसंगावधान राखत भगदाड पडलेल्या जागी चादरी घालून पाणी अडवले.
त्यांनी जवळच मासेमारी करीत असलेल्या इतर बोटींना मदतीसाठी पाचारण केले. या वेळी धडक देणाऱ्या मालवाहू जहाजाने घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर रात्री एक वाजण्याच्या सुमारास ही अपघातग्रस्त बोट डहाणूच्या किनाऱ्यावर आणण्यात आली.
या घटनेमुळे मच्छीमार संघटनाकडून संताप व्यक्त केला जात आहे. खोल समुद्रात आम्ही मासेमारी करायची की नाही, असा सवालही मच्छीमार नेते अशोक अंभिरे यांनी केला आहे.
