मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूकीसाठी रश्मी ठाकरे, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी वांद्रे येथील चेतना कॉलेजमधिल मतदान केंद्रावर मतदान केले.
मुंबई : मुंबई विद्यापीठाची सिनेटची वादग्रस्त ठरलेली निवडणूकीसाठी अखेर आज मंगळवारी शांततेत मतदान पार पडले. मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीच्या १० जागांसाठी एकूण २८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. या निवडणुकीसाठी एकूण मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण ३८ मतदान केंद्रावर आणि ६४ बुथवर ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीचा निकाल आता शुक्रवार, २७ सप्टेंबरला जाहीर करण्यात येणार आहे.
मुंबई विद्यापीठावर ठाकरे सेनाप्रणित युवासेनेचे वर्चस्व असल्याने सत्ताधारी महायुती ही निवडणूक होऊ देत नव्हती असा आरोप युवा सेनेतर्फे करण्यात आला होता. याचसाठी दुसऱ्यांदा निवडणूक अन्यायकारकरित्या स्थगित केल्याप्रकरणी युवासेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर तातडीने सुनावणी करताना उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा निर्णय रद्द ठरवत निवडणूक घेण्याचे आदेश दिले होते. मात्र, तत्काळ निवडणूक घेण्यास विद्यापीठाने असमर्थता दर्शवली होती. यानंतर आज, मंगळवारी २४ सप्टेंबरला ही निवडणूक पार पडली. यासाठी आवश्यक कर्मचारी आणि निरीक्षकांची नेमणूक करण्यात आली होती.
आज सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत यासाठीची मतदान प्रक्रिया पार पडली. साधारणतः ५५ टक्के मतदान या निवडणुकीत झाले असल्याची माहिती समोर आली आहे. रश्मी उद्धव ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे यांनी यासाठी आज मतदान केले.