अशोक गायकवाड
कर्जत : महाराष्ट्र शासनाने यंदाच्या अर्थसंकल्पात घोषित केल्याप्रमाणे राज्यभर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय ३० जुलै रोजी जारी झाला आहे.कर्जत तालुक्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार कर्जत धनंजय जाधव यांनी केले आहे.
केंद्र सरकारच्या उज्वला योजनेच्या महिला तसेच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांचे कुटुंब देखील या योजनेसाठी पात्र असणार आहे. या योजनेकरीता एका रेशनकार्डवरील एकच महिला पात्र ठरणार असून एक कार्डवर तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत. या योजनेच्या लाभासाठी सदर गॅस जोडणी ही लाभार्थी महिलेच्या नावे असणे आवश्यक आहे. या योजनेच्या लाभार्थीना प्रथम गॅस सिलेंडरची बाजारभावानुसार पूर्ण रक्कम (अंदाजे ८३० रुपये) भरावी लागेल व त्यानंतर सदर सिलेंडरसाठी भरलेली संपूर्ण रक्कम शासन अनुदान स्वरुपात लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. एका महिन्यात एकाच सिलेंडर साठी शासन अनुदान मिळणार आहे.यामुळे महिला सक्षमीकरण, स्वच्छ इंधन, पर्यावरण संरक्षणास मोठा हातभार लागणार आहे. कर्जत तालुक्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन तहसीलदार धनंजय जाधव यांनी केले आहे.
0000
