सर्व शाळांमध्ये आरोग्याच्या जपणुकीसाठी सॅनिटरी नॅपकीनविषयी जनजागृती

नवी मुंबई :‘स्वच्छता ही सेवा 2024’ मोहिमेअंतर्गत 17 सप्टेंबर ते 02 ऑक्टोबर या पंधरवडयात स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत असून विविध उपक्रमांतून स्वच्छतेचा संस्कार रूजविण्यात येत आहे. या उपक्रमांमध्ये नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थ्यांचा व्यापक प्रमाणात सहभाग घेऊन त्यांच्यामध्ये लहान वयापासूनच स्वच्छतेची जाणीव जागृती करण्यावर भर दिला जात आहे.

या अनुषंगाने शालेय स्तरावर विविध उपक्रम राबवितानाच वैयक्तिक स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांसह महापालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये 25 सप्टेंबर रोजी ‘सॅनेटरी नॅपकीन जनजागृती’ उपक्रम अत्यंत प्रभावीपणे राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये सॅनेटरी नॅपकीन वापरणेबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात येऊन त्यात किशोरवयीन विद्यार्थिनींमध्ये सॅनेटरी नॅपकीनबाबत जनजागृती करण्यात आली. किशोरवयीन मुलींमध्ये मासिक पाळीच्या स्वच्छतेबाबत जागरूकता वाढविणे तसेच वापरून झालेल्या सॅनटरी नॅपकीनची पर्यावरणपूरक पध्दतीने सुरक्षित विल्हेवाट लावणे याबाबत तज्ज्ञ मार्गदर्शकांनी सुसंवाद साधला. यामध्ये वैयक्तिक स्वच्छता ठेवणे तसेच आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करण्यात आली.

पर्यावरण संरक्षणाकरिता तसेच वैयक्तिक आरोग्याकरिता सॅनेटरी नॅपकीनचा वापर होणे आवश्यक असल्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यादृष्टीने प्रत्येक शाळेत उपलब्ध असलेल्या सॅनेटरी मशिनचा वापर करण्याची पध्दती विद्यार्थिनींना प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आली.

त्याचप्रमाणे वापरून झालेल्या सॅनेटरी नॅपकिन्समुळे जंतूसंसर्ग व त्वचेचे रोग होऊ नयेत याकरिता तसेच सॅनेटरी नॅपकिन्सच्या कच-यामुळे पर्यावरणास हानी पोहचते हे लक्षात घेऊन या कच-याची सुरक्षित रितीने योग्यप्रकारे विल्हेवाट मशीनव्दारे करण्याबाबतही मार्गदर्शन देण्यात आले. काही शाळांमध्ये सॅनेटरी नॅपकीनचे वाटपही करण्यात आले. काही शाळांमध्ये याप्रसंगी पालक महिलाही उपस्थित होत्या.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महानगरपालिकेच्या व खाजगी शाळांमध्ये सॅनेटरी नॅपकीन वापर व वापरानंतर त्याची योग्यप्रकारे विल्हेवाट याबाबत ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीमेअंतर्गत प्रभावीपणे जनजागृती करण्यात आली व ही सवय स्वत:च्या आरोग्य जपणूकीसाठी कायमस्वरूपी अंगिकारावी असे मार्गदर्शन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *