रमेश औताडे
मुंबई : दिव्यांगाना अत्योदय योजनेचा लाभ का मिळत नाही ? दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता स्वाधार योजना तातडीने लागू का होत नाही ? दिव्यांगाना महामंडळाकडून वितरीत केलेले कर्ज माफ का होत नाही ? असे अनेक सवाल करत प्रहार दिव्यांग क्रांती संस्था संघटनेने आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन केले.
अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही सरकारचे लक्ष नाही. कोरोना काळात अनेकांचे व्यवसाय बंद पडले त्यात आम्ही ही होतो. मग आमचे कर्ज माफ केले का नाही ? असा सवाल संघटनेचे जिल्हाध्यक्ष मंगशे साळवी यांनी यावेळी केला.
दिव्यांगाना सहा हजार रुपये पेन्शन, प्रत्येक जिल्हयामध्ये स्वयंरोजगाराकरिता स्टॉल मिळावेत. दिव्यांग लाभार्थ्यांच्या बँक खात्यात मानधन खुप उशीरा जमा का होते ते लवकरात लवकर जमा करावे. प्रत्येक जिल्हयामध्ये सुसज्ज अशा दिव्यांग भवनाची निर्मिती करून आम्हाला योग्य आसरा देण्यात यावा. रेल्वे जिने हे सरकते असावेत.जेणेकरून आम्हाला योग्य प्रकारे प्रवास करता येईल. असे मंगेश साळवी यांनी सांगितले.
