स्वाती घोसाळकर
मुंबई : महाराष्ट्रातील निवडणूकीचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. महाराष्ट्रातील
आगामी निवडणूकीचा आढावा घेण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांसह केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, तसेच निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू यांच्या शिष्टमंडळाचे आज रात्री 8 वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले.
विमानतळावर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम आणि यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी पी. प्रदीप तसेच मुंबई उपनगर जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर उपस्थित होते.
२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीसाठी २१ ऑक्टोबर २०१९ रोजी एकाच फेरीत संपुर्ण महाराष्ट्रात सर्व २८८ जागांसाठी मतदान झाले. या निवडणुकीत एकूण ६१.४% मतदान झाले होते. आणि २४ ओक्टोबरला मतमोजणीही झाली होती. आजवर तिन्ही वेळा हरयाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणूका एकाचवेळी घोषित झाल्या होत्या पण यंदा निवडणूक आयोगाने हरयाणाच्या निवडणूका घोषित करताना महाराष्ट्राच्या निवडणूका मात्र लांबणीवर टाकल्या होत्या. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर टिका केली होती. सरकारच्या दबावामुळेच निवडणूका पुढे ढकलल्याचा आरोप केला गेला होता.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या शिष्टमंडळात वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त धमेंद्र शर्मा, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त नितेश व्यास, वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त मनीश गर्ग, उपनिवडणूक आयुक्त हिर्देश कुमार, उपनिवडणूक आयुक्त अजित कुमार, उपनिवडणूक आयुक्त मनोजकुमार साहू, उपनिवडणूक आयुक्त संजय कुमार, उपनिवडणूक आयुक्त त्याचबरोबर आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समावेश आहे.
२७ ते २८ सप्टेंबर या दोन दिवसीय भेटी दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी हे राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव यांच्यासह राज्यातील विविध अंमलबजावणी अधिकारी यांच्यासोबत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेणार आहेत. यानंतर निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीची घोषणा करण्याची शक्यता आहे.
photo caption
महाराष्ट्रातील निवडणूकीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त डॉ. सुखबीर सिंह संधू यांच्या शिष्टमंडळाचे गुरुवारी रात्री 8 वाजता मुंबई विमानतळावर आगमन झाले.
