आज ठाण्यात मोर्चा
ठाणे : राज्य सरकारने धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात म्हणजेच अनुसूचित जमातीअंतर्गत आरक्षण देण्यासाठी समिती गठीत केली आहे. त्या निषेधार्थ तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गात धनगरांचा समावेश करू नये, या मागणीसाठी सोमवारी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे.
१५ सप्टेंबर २०२४ रोजी महाराष्ट्र सरकारने धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यासाठी समितीचे गठन केले आहे. या संदर्भात स्वतंत्र जी. आर. काढण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याविरोधात हा मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला. या मोर्चाच्या आयोजनासंदर्भात आज शासकीय विश्रामगृहात नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीला अनिल भांगले, हंसराज खेवरा , दीपक पेंदाम, रमेश परचाके, रमेश आत्राम, मधुकर तळपाडे, समीर तडवी आदी उपस्थित होते. महाराष्ट्रात भटक्या जमातींसाठक एनटी-सी हा प्रवर्ग असून त्यामध्ये केवळ धनगर या एकाच भटक्या जमातींची समावेश आहे. या प्रवर्गास ३.५% आरक्षण देण्यात आलेले आहे. उलटपक्षी एसटी प्रवर्गासाठी ७ टक्के आरक्षण असून सुमारे ४७ जातींचा समावेश त्यामध्ये आहे. दिवसागणिक अनुसूचित जमातींची संख्या वाढत असल्याने धनगरांचा समावेश केल्यास मूळचा आदिवासी बांधव आरक्षणापासून वंचित राहणार आहे. अशा स्थितीत जर शासन अध्यादेश काढणार असेल तर ते घटनाबाहय ठरणार आहे त्यामुळेच घटनाबाह्य निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समिती मुंबई व ठाणे यांच्या वतीने हा मोर्चा काढण्यात येणार आहे, हंसराज खेवरा आणि अनिल भांगले यांनी सांगितले. सोमवारी सकाळी १० वाजता भगवती शाळेपासून या मोर्चाला सुरूवात होणार असून गोखले रोड, राम मारुती रोड मार्गे, पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स चौकातून तलावपाळी रोड, राजवंत ज्वेलर्स पासून डावीकडे गडकरी रंगायतन चौकातून उजवे वळण घेऊन चिंतामणी चौक, जांभळी नाका येथून अग्यारी रोड मार्गे टेंभी नाका येथून उजवीकडे कोर्ट नाका, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पुढे राघोजी भांगरे चौक, कोर्ट नाका शासकीय विश्रामगृह येथे मोर्चाचे सभेत रुपांतर होईल, असेही संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले.
