पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रणशिंग फुंकले
अविनाश पाठक
चंद्रपूर : येणारी २०२४ ची लोकसभा निवडणूक ही स्थिर सरकार विरुद्ध अस्थिर सरकार अशी निवडणूक होते आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही देशाला स्थैर्याकडे नेऊ बघते आहे, तर विरोधक असलेल्या इंडिया आघाडी ला हा देश अस्थिरच करायचा आहे, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर येथे एका विशाल जनसभेला संबोधित करताना केला.
भारतीय जनता पक्षाचे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार अशोक नेते यांच्या प्रचारासाठी चंद्रपूर येथे आयोजित एका विशाल जन सभेला मोदी संबोधित करीत होते. यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री रामदास आठवले माजी गृहराज्यमंत्री हंसराज आहे अहिर उमेदवार अशोक नेते आणि सुधीर मुनगंटीवार प्रभृती यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
काँग्रेसने देशाला अस्थैर्याच्या खाईत लोटले असा आरोप करीत अस्थिर सरकारचे काय परिणाम होतात हा अनुभव महाराष्ट्राने मधले अडीच वर्षे घेतला आहे असा दावा मोदी यांनी यावेळी केला. महाराष्ट्रातील महाआघाडी सरकार हे फक्त कमिशन घेणारे सरकार होते असा आरोप करीत कमिशन द्या अन्यथा प्रकल्प थांबवा असे सांगून आधीच्या फडणवीस सरकारने सुरू केलेले अनेक लोकहिताचे प्रकल्प महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारने थांबवले याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले. मुंबईचा मेट्रो प्रकल्प कोकणातील रिफायनरी विदर्भातील समृद्धी महामार्ग जलयुक्त शिवार प्रकल्प हे सर्व प्रकल्प या महाआघाडी सरकारने कमिशन साठी थांबवले अशी टीका त्यांनी केली. आमच्या सरकारने हे सर्व प्रकल्प पुन्हा सुरू केल्याचेही त्यांनी नमुद केले.
यावेळी काँग्रेस पक्ष हा समस्यांची जननी असल्याची टीका मोदींनी केली. आज काँग्रेसलाच इतक्या समस्या आहेत की त्यांनी देशातील जनाधार गमावला आहे याकडे लक्ष वेधताना देशाचे विभाजन काँग्रेसनेच केले आणि काश्मीरची समस्या ही काँग्रेसने चिघळवली असा आरोप त्यांनी यावेळी केला. नक्षलवादाला खतपाणी घातल्यामुळे गडचिरोली सारख्या संपन्न क्षेत्राचा विकास थंडावला असे सांगून आम्ही नक्षलवाद देखील आटोक्यात आणला आहे आणि आता नक्षलवादासाठी ओळखली जाणारी गडचिरोली हे पोलाद सिटी म्हणून ओळखले जाणार आहे असे त्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात जाहीर केले. काँग्रेसला पुन्हा एकदा देशाचे विभाजन करायचे आहे असा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला. काँग्रेसची अवस्था कडू कारल्यासारखी आहे असे सांगताना एक मराठी म्हण सांगत कारले तुपात तळले किंवा साखरेत घोळले तरी ते कडूच असते, त्याचप्रमाणे काँग्रेस ही काहीही केले तरी कडूच राहणार आहे अशी मल्लिनाथीही त्यांनी केली.
नरेंद्र मोदी देशात कुठेही जातात तर काश्मीर समस्येचा उल्लेख करतात असा आरोप काँग्रेसजन करतात याकडे लक्ष वेधत मोदी म्हणाले की काश्मीर हा भारताचा भाग नाही का? छत्रपती शिवाजी किंवा लोकमान्य टिळकांनी काश्मीर किंवा दिल्ली ही आपलीच मानली होती ना. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी काश्मीरमध्ये आतंकवाद वाढला त्यावेळी दुःख व्यक्त केले होतेच ना. असे सांगून जर आम्ही काश्मीर बद्दल बोललो तर त्यात चूक काय असा सवाल त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा पुढे नेत असल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मोदींनी कौतुक केले. तर काँग्रेसजनांना बोलावून महाराष्ट्रात आंदोलन करतात असा आरोप करताना शिवसेना ठाकरे गटाचा उल्लेख त्यांनी नकली शिवसेना असा केला. देशात आतंकवादाला संरक्षण कोणी दिले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न कोणी नाकारले? राम मंदिरात उभारणीत अडंगा कोणी आणला? असे विविध प्रश्न उपस्थित करून त्यांनी काँग्रेसची पोलखोल केली.
गत दहा वर्षात देशातील मोदी सरकारने केलेल्या विविध लोकोपयोगी कामांचा उल्लेख आपल्या भाषणात त्यांनी यावेळी केला. गरिबांना दिलेली घरे उज्वला योजनेअंतर्गत मोफत गॅस पाच लाखापर्यंत मोफत इलाज ८० कोटी लोकांना मोफत रेशन अशा विविध योजनांची माहिती देत हे हा मोदी गॅरंटीचा परिणाम नाही तर आपल्या एका मताचा परिणाम आहे असे सांगून यावेळीही आपण सर्वांनी आपले मत भाजप उमेदवारालाच द्या असे आवाहन त्यांनी केले.
आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी शुद्ध मराठीत केली चंद्रपूर येथे महाकालीच्या पावनभूमीत मी आलो असून महाकालीच्या चरणी मी वंदन करतो आणि देशभरातील नागरिकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो असे त्यांनी शुद्ध मराठीत सांगून पहिल्याच वाक्यात उपस्थित त्यांची मने जिंकली . कडु कारल्याची म्हण देखील त्यांनी मराठीतच ऐकवली. चंद्रपूरने राममंदिर आणि संसद भवन यासाठी लागणारे लाकूड पुरवल्या चारही त्यांनी भाषणात उल्लेखही केला.
सभेच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रभृतींनी जनसभेला संबोधित केले. यावेळी उमेदवार सुधीर मुनगंटीवार आणि अशोक नेते यांचीही समायोजित भाषणे झाली.
काँग्रेसने माफीनामा जाहीर करायला हवा – एकनाथ शिंदे
चंद्रपुर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आज चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. भाजपाचे चंद्रपूरचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने ही सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी टीका केली. “काँग्रेसने जाहीरनामा नाही तर माफीनामा प्रसिद्ध करायला हवा”, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला आहे.
“सुधीर मुनगंटीवार यांच्या विजयाची गुढी आपल्याला नक्कीच उभारायची आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी नक्कीच हॅट्रीक करतील. ४ जूनला निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर असाच जल्लोष आपल्याला करायचा आहे. कारण पुन्हा एकदा देशात मोदी सरकार येणार ही गॅरंटी १४० कोटी देशवाशीयांनी घेतली आहे. आज देशामध्ये मोदींची गॅरंटी चालते. मात्र, इतर लोकांच्या गॅरंटीवर कोणाचाही भरवसा नाही. काँग्रेसचे सरकार असताना आपला देश कोणत्या परिस्थितीत होता हे सर्वांना माहिती आहे. दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट, दंगली, भ्रष्ट्राचार, अशा अनेक गोष्टींनी आपला देश ग्रासला होता. पण गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशात विकास होत आहे”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
