धाराशिवच्या शिवसैनिकांची ठाण्यात घोषणाबाजी
ठाणे : धाराशिवची शिवसेनेची हक्काची लोकसभेची जागा राष्ट्रवादीला दिल्यामुळे संतप्त झालेल्या हजारो शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. धनुष्यबाण रामाचा धनंजयदादा कामाचा अशा घोषणांनी अवघे ठाणे दणाणून सोडले. धनंजय सावंत हे धाराशिवचे पालकमंत्री तानाजी सावंत याचे पुतणे असून धाराशिव मधून उमेदवारीसाठी ते इच्छुक होते. धनंजय सावंत यांनी आज मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवास्थानाबाहेर आज शक्तीप्रदर्शन चेले. धाराशिवमधून ३००० कारमधून त्यांनी १५००० शिवसैनिक ठाण्यात आणले होते. धाराशिव लोकसभेमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतुन अर्चना पाटील यांना उमेदवारी दिल्याने तानाजी सावंत आणि कार्यकर्ते नाराज आहेत. धाराशिव ची जागा शिवसेनेची पारंपरिक जागा असल्याने ती शिवसेनेला मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदें चंद्रपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेस गेले होते. तेथून ते थेट ठाण्यात शिवसैनिकांची समजूत काढण्यासाठी येणार होते. पण शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा शिंदे शिवसैनिकांची समजूत घालण्यासाठी आले नव्हते. दरम्यान मुख्यमंत्र्यांची भेट झाल्याशिवाय ठाणे सोडणार नाही अशा निर्धार शिवसैनिकांनी यावेळी केला.
