5500 हून अधिक नागरिक सहभागातून
नवी मुंबई : नवी मुंबई हे दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे शहर असून सायन पनवेल महामार्ग हा अत्यंत महत्वाचा व वर्दळीचा रस्ता शहरातून जातो. या महामार्गाचे सर्वाधिकार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असले तरी या रस्त्यावर स्वच्छता असावी व नवी मुंबईचा स्वच्छ शहर नावलौकिक कायम रहावा यादृष्टीने महानगरपालिका नेहमीच सतर्क असते. याच अनुषंगाने ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत आयोजित करावयाच्या स्वच्छताविषयक विविध उपक्रमांमध्ये आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी सायन पनवेल महामार्गाची सखोल स्वच्छता मोहीम राबविण्याचे प्राधान्याने निर्देश दिले व त्यासोबत ठाणे बेलापूर मार्ग या शहरातील आणखी एका वर्दळीच्या मार्गावरही सखोल स्वच्छता मोहीम राबविण्याचे निश्चित करण्यात आले.
त्यानुसार रविवारच्या सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी स्वच्छता मोहीमेत व्यापक प्रमाणात लोकसहभाग लाभेल या भूमिकेतून या दोन्ही महत्वाच्या मार्गांच्या दुतर्फा स्वच्छता मोहीमेचे नियोजन करण्यात आले. 17 सप्टेंबरपासून स्वच्छता ही सेवा पंधरवड्यात दररोज आयोजित करण्यात येणा-या स्वच्छताविषयक उपक्रमांनी प्रेरित झालेल्या 5 हजार 500 हून नवी मुंबईकर नागरिकांनी आज महापालिका अधिकारी, कर्मचारी व स्वच्छताकर्मींसमवेत सायन पनवेल महामार्ग व ठाणे बेलापूर मार्गावर यशस्वीरित्या सखोल स्वच्छता मोहीम राबवली.
विशेष म्हणजे डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, अलिबाग यांचे 2700 हून अधिक श्रीसदस्य हे पद्मश्री, महाराष्ट्रभूषण डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ.सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या महामार्ग सखोल स्वच्छता महामोहीमेत सक्रिय सहभागी होते.
सकाळी 7 वाजल्यापासून सुरू झालेल्या या सखोल स्वच्छता महामोहीमेचे व्यवस्थित नियोजन करण्यात आले होते. वाशी, तुर्भे व सानपाडा, जुईनगर, नेरूळ, बेलापूर या विभाग कार्यालयांच्या हद्दीत येणा-या सायन पनवेल महामार्गाच्या स्वच्छता मोहीमेत महापालिका अधिकारी-कर्मचारी, स्वच्छतामित्र तसेच डॉ.श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य यांना महामार्गावरील क्षेत्र वाटप करून देण्यात आले होते. यांच्यासमवेत त्या त्या विभागांच्या हद्दीतील नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य, एनएसएसचे विद्यार्थी, युवक मोठ्या संख्येने उत्स्फुर्तपणे आपापल्या विभागात सहभागी झाले.
