मानधनवाढ, ग्रॅच्युइटी, मासिक पेन्शनच्या मागण्यांसाठी

ठाणे : मानधनवाढ, ग्रॅच्युइटी, मासिक पेन्शन या मागण्यांचा शासकीय निर्णय न झाल्यास अंगणवाडी कर्मचारी आक्रमक पवित्रा घेणार असून १ ऑक्टोबरला संपूर्ण राज्यात चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे एम ए पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे, जयश्री पाटील या नेत्यांनी दिली.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी २३ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचे पाऊल उचलले. २४ तारखेला मा महिला व बालविकास मंत्र्यांनी २६ तारखेला वित्त मंत्र्यांसोबत बैठक घेऊन चर्चा करण्याचे व लगेच कॅबिनेटमध्ये मांडून निर्णय घेण्याचे मान्य केले. त्यांच्या विनंतीवरून बेमुदत उपोषणाचे रुपांतर बेमुदत धरण्यामध्ये करण्यात आले. २५ सप्टेंबर रोजी सुमारे १६ हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी सत्याग्रह करून स्वतःला अटक करून घेतली. पोलिसांची संपूर्ण यंत्रणा कोलमडून पडली. २६ सप्टेंबर रोजी बेमुदत धरण्यामध्ये मुंबईतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले व मागण्या कॅबिनेटमध्ये मान्य होऊन शासकीय आदेश निर्गमित होईपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्धार जाहीर केला. इतके होऊनही शासनावर काही परिणाम झालेला दिसत नाही. त्यामुळे आज धरणे आंदोलन करणाऱ्या कृती समितीच्या प्रतिनिधींची बैठक होऊन ३० सप्टेंबर पर्यंत शासनाने मानधन वाढ, ग्रॅच्युइटी व मासिक पेन्शनचा निर्णय न घेतल्यास १ ऑक्टोबर मुंबईसह संपूर्ण राज्यातील अंगणवाडी कर्मचारी रस्त्यावर उतरून चक्का जाम आंदोलन करतील असा इशारा कृती समितीने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *