जळगाव : आरक्षण कायमचं संपलं पाहिजे, या मुद्द्यावर काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना व भाजप हे चारही पक्ष एक आहेत, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. जळगाव येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, जरांगे पाटील त्यांची मागणी शासनाने सोडवली नाही म्हणून तो आता कळीचा मुद्दा झाला आहे. ओबीसी समाजातून आरक्षण द्यावं, अशी जरांगे पाटील यांची मागणी आहे. या मागणीवर राजकीय पक्षांनी भूमिका घेतलेली नाही. ओबीसींच्या कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देता कामा नये ही भूमिका ओबीसी समाजाने घेतली आहे. ओबीसींच्या भूमिकेला वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे पाठिंबा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
तर रत्नागिरीच्या सभेमध्ये शरद पवारांनी जरांगे पाटलांची मागणी योग्य असल्याचे म्हणत त्यांना पाठिंबा दिला. शरद पवारांच्या पाठिंब्यानंतर ती भूमिका राष्ट्रवादीची आहे, असे स्पष्ट होते. ओबीसींचे आरक्षण हे ओबीसींनाच राहिलं पाहिजे. त्यामध्ये इतर कोणाचाही समावेश होता कामा नये, ही वंचित आघाडीची भूमिका आहे. सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर वेगळं आरक्षण द्यावं. राज्यात आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा असून यावरच विधानसभेची निवडणूक लढली जाईल, असेही प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.