महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला सफाई मोहिमेत सहभाग

 

ठाणे : ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात मंगळवारी पारसिक रेती बंदर येथे प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या साखळीचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात परिसरातील हजारो विद्यार्थी सहभागी झाले.
प्लास्टिकमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्या आकाराचा देव मासा आणि त्याच्या पोटात साठलेला प्लास्टिकचा कचरा हे प्रतिक साकारण्यात आले. तसेच, विद्यार्थ्यांनी प्लास्टिक न वापरण्याची प्रतिज्ञाही यावेळी केली. या उपक्रमास महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी भेट दिली. घोषवाक्यांसह सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक केले.
याच निमित्ताने, पारसिक रेतीबंदर घाट येथे साफसफाई मोहिमेचेही आयोजन करण्यात आले होते. त्यात महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त मनीष जोशी, आरोग्य अधिकारी डॉ. राणी शिंदे, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. विसजर्न घाटावर वाहून आलेले निर्माल्य, तरंगता कचरा यावेळी बाहेर काढण्यात आला.
बुधवारी होणार सांगता
‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानाअंतर्गत गेले पंधरा दिवस सुरू असलेल्या उपक्रमांची सांगता, तसेच स्पर्धांच्या पारितोषिक वितरणाचा सोहळा बुधवार, ०२ ऑक्टोबर रोजी उपवन तलावालगतच्या अॅम्फी थिएटर येथे होणार आहे. या सोहळ्यातही नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन उपायुक्त (घनकचरा) मनीष जोशी यांनी केले आहे.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *