मुंबई पदविधरचे आमदार आणि पक्षाचे नेते ॲड. अनिल परब यांच्या वचनपूर्तीनिमित्त आयोजन
मुंबई : राज्यात महायुती सरकारच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात वाढलेल्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर मराठी तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) ‘महा रोजगार’ मेळाव्याचे विलेपार्ले -पूर्व येथे शनिवारी, ५ ऑक्टोबर रोजी आयोजन केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘महा रोजगार’ मेळाव्याचे उद्धघाटन होणार असून शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची मेळाव्याला प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती मेळाव्याचे संयोजक शिवसेना नेते व मुंबई पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अनिल परब यांनी मंगळवारी वांद्रे येथील पत्रकार परिषदेत दिली.
राज्यात महायुती सरकारच्या काळात बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. अनेक उद्योग शेजारच्या राज्यात पाठविले गेले. रोजगार निर्माण करण्यात महायुती सरकार पूर्णपणे आपल्याशी ठरली आहे. त्यातच राज्यात रोजगारांची वानवा असतानाच बड्या कंपन्यांनाना महायुतीचे सरकार प्रदूषणाच्या नोटीसा पाठवत आहे. मात्र या नोटीसांचे पुढे काय होते, हे गौडबंगाल आहे, असा आरोप ॲड. अनिल परब यांनी केला.
राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार आहे. आमचे सरकार तरुणांना नोकऱ्या देणे व सरकारी रिक्त जागा भरण्याचे काम वेगाने करेल. राज्यातील बेरोजगारीची परिस्थिती हाताळण्यावर आमचे सरकार लक्ष केंद्रित करेल. शेजारील गुजरातमध्ये स्थलांतर होत असलेले उद्योग रोखले जातील, असे ॲड. अनिल परब यांनी स्पष्ट केले.
परब यांनी विधान परिषद निवडणुकीत दिलेल्या अशवसानाच्या वचनपूर्तीनिमित्ताने हा महा रोजगार मेळावा आयोजित केला आहे. ह्या मेळाव्यात लॉजिस्टीक, बँकींग, इन्शुरन्स, बीपीओ, हॉस्पिटॅलिटी, फायनान्स, शिक्षण, बांधकाम, माहिती तंत्रज्ञान, उद्योग क्षेत्रातील १३० कंपन्या सहभागी होणार आहेत. त्यामध्ये ॲमेझॉन, हिंदुजा, एचडीएफसी, एसबीआय, बजाज, टाटा एआयजी, एअरटेल, आयसीसी लोम्बार्ड अशा नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना आमदार ॲड. अनिल परब म्हणाले की, या मेळाव्यासाठी १३ हजार युवकांनी नोंदणी केली आहे. सुमारे १६ हजार युवक मेळाव्यात सहभाग घेणे अपेक्षीत असून सुमारे १४ हजार युवकांना या मेळाव्यात रोजगार मिळेल. मेळाव्यासाठी नोंदणी केलेल्या युवकांनी येताना बायोडेटा, केवायसी कागदपत्रे आणि छायाचित्र सोबत आणावे, असे आवाहन आमदार ॲड. परब यांनी केले आहे.
ॲड. अनिल परब पुढे म्हणाले की, विधान परिषद मुंबई पदवीधरच्या निवडणुकीच्या जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती म्हणून हा मेळावा होत आहे. यापुढे दरवर्षी महा नोकरी मेळाव्याचे आयोजन केले जाणार आहे. जाहिरनाम्यामध्ये दिलेल्या आश्वासनांची वचनपूर्ती पहिल्या शंभर दिवसात करण्याचे वचन दिले होते, ते वचन आम्ही या मेळाव्याच्या निमित्ताने पूर्ण करत आहोत.
जून मध्ये पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवार ॲड. अनिल परब यांनी मुंबई पदधीर मतदारसंघात भाजपचे उमेदवार किरण शेलार यांचा २६ हजार मतांनी पराभव केला होता. ॲड. अनिल परब हे विधान परिषदेचे शिवसेनेचे गटनेते असून त्यांची विधान परिषद आमदारकीची चौथी टर्म आहे.