खिडकाळी येथे केमिकल रिसर्च इन्स्टिट्यूटला मंजूरी

 

डोंबिवली: मुंबई महानगरांचा विकास करताना येथे शैक्षणिक संस्थांची उभारणी करुन हे क्षेत्र रिसर्च हब म्हणून विकसित करण्याचा मानस आहे. यातून ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण भागातील खिडकाळी येथे संशोधन केंद्राची उभारणी केली जाणार आहे.
शैक्षणिक वापरासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर रसायन तंत्रज्ञान संस्थेच्या संशोधन केंद्र उभारणीच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. मंत्रीमंडळ येथे पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यास मान्यता दिली आहे. यामुळे उपनगर तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संशोधन क्षेत्रात अभ्यास करण्यासाठी मोठे दालन खुले होणार आहे.
मुंबई पल्याडची ठाणे, कल्याण ही शहर शैक्षणिक हब म्हणून उदयाला येत आहेत. संशोधन क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी मात्र आजही येथील विद्यार्थ्यांना मुंबई येथील विद्यापीठ, महाविद्यालयांकडे धाव घ्यावी लागते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना हा शैक्षणिक प्रवास आणखीनच खडतर होऊन जातो. मुंबई महानगर प्रदेशाचा विकास करताना शैक्षणिक संशोधन संस्थांची उभारणी करुन हे क्षेत्र रिसर्च हब म्हणून विकसित करण्याचा मानस कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठेवला आहे.
त्यादृष्टीने, अतिशय मोक्याच्या असलेल्या खिडकाळी परिसरात संशोधन केंद्र व्हावे, यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी पाठपुरावा केला होता. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयी मान्यता देण्यात आली असून खासदार शिंदे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
खिडकाळी येथील राज्य शासनाच्या मालकीचा हा भूखंड उच्च व तंत्र शिक्षण विभागास रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई या संस्थेच्या रुपांतरीत संशोधन केंद्र या शैक्षणिक उपक्रमासाठी विनामूल्य हस्तांतरीत करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ही संस्था रसायन तंत्रज्ञान संस्था (ICT) यांच्या मार्फत विकसित करण्यात येणार आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने रसायन तंत्रज्ञान संस्था, मुंबई या संस्थेस अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिलेला आहे. तर, या संस्थेची शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी पाहून उच्च व तंत्र शिक्षण विभागाने या संस्थेला ‘एलिट इन्स्टिट्यूशन’ हा दर्जा दिलेला आहे. या संस्थेची गणना देशातील आयआयटी, आयएससी, आयआयएसइआरएस या निष्णात संस्था बरोबरीने केली जाते.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *