महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचे माजी नेते आणि विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषद सदस्य एकनाथ खडसे आता भारतीय जनता पक्षात परत येणार अशी चर्चा गेले काही दिवस सुरू होती. त्या वृत्तावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. दस्तूरखुद्द एकनाथ खडसे म्हणजेच नाथाभाऊंनी आपण भारतीय जनता पक्षात परत येणार असून येत्या पंधरा दिवसात आपला पक्षप्रवेश होईल अशी माहिती वृत्तवाहिन्यांशी बोलताना दिली आहे.
एकनाथ खडसे यांच्या या घोषणेने राजकीय वर्तुळात थोडीफार का होईना पण खळबळ माजणे अपेक्षितच होते. त्यानुसार त्यांच्या या पुनरागमनावर चर्चा सुरू झाली आहे. ती चर्चा ते पक्षात परत येईपर्यंत सुरूच राहील हे नक्की.
एकनाथ खडसे हे भारतीय जनता पक्षाचे एक दबंग नेतृत्व म्हणून ओळखले गेले होते. भारतीय जनता पक्ष हा आधी भारतीय जनसंघ म्हणून कार्यरत होता. जनसंघाच्या काळापासून नाथाभाऊ हे कार्यरत होते. त्यांच्यावरही मुळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाल्यामुळे ते सहाजिकच जनसंघात सक्रिय झाले होते. खानदेशात जनसंघ आणि नंतर भारतीय जनता पक्ष रुजवण्यात त्या काळात उत्तमराव उपाख्य नानासाहेब पाटील यांच्यासारख्या खंद्या नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्यांपैकी ते एक होते. त्यामुळेच महाराष्ट्रात जेव्हा शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तारूढ झाले तेव्हा नाथाभाऊंना आधी अर्थमंत्रीपद आणि नंतर पाटबंधारे मंत्रीपद देण्यात आले होते. या दोन्ही खात्यांची जबाबदारी त्यांनी अत्यंत योग्यरित्या पार पाडली होती.
नंतरच्या काळात २००९ मध्ये ज्यावेळी विरोधी पक्षनेतेपद भाजपकडे आले त्यावेळी नाथाभाऊंनाच ती जबाबदारी सांभाळावी लागली. पाच वर्ष त्यांनी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते म्हणून तत्कालीन अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण सरकारला चांगलाच घाम फोडला होता.
२०१४ मध्ये देशात मोदी लाट आली आणि त्यावेळी लोकसभेत प्रथमच भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले. महाराष्ट्रातही भाजपला चांगल्या जागा मिळाल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीमध्ये भाजपच्या जागा वाढवाव्या यासाठी चर्चा सुरू होती. मात्र शिवसेनेच्या अडेलतट्टू धोरणामुळे ती चर्चा यशस्वी होऊ शकली नाही. त्यावेळी आम्ही शिवसेनेसोबतची युती तोडत आहोत ही घोषणा करण्याची आणि हा निरोप शिवसेनेकडे पोहोचवण्याची जबाबदारीही नाथाभाऊंकडेच सोपवली होती आणि त्यांनी ती यशस्वीपणे पारही पाडली होती.
नाथाभाऊंची ज्येष्ठता आणि पक्षासाठी त्यांनी केलेले काम हे बघ आता महाराष्ट्रात ज्यावेळी भारतीय जनता पक्षाची सत्ता आली त्यावेळी आपल्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवले जाईल अशी त्यांना अपेक्षा होती. राजकीय विश्लेषकांचेही तसे अंदाज होते. मात्र भाजपच्या तत्कालीन नेतृत्वाने त्यांना मुख्यमंत्री न करता त्यांच्या तुलनेत तरुण असलेल्या देवेंद्र फडणवीसांकडे ती जबाबदारी सोपवली. तिथून नाथाभाऊ काहीसे नाराज झाले होते. अर्थात त्यावेळी त्यांच्याकडे महसूल खात्यासारखे जबाबदारीचे खाते सोपवण्यात आले होते. त्या खात्याचे मंत्री म्हणूनही त्यांनी आपली छाप पाडली होती.
नेमकी याच वेळी त्यांचे नशीब आडवे आले आणि विरोधकांनी त्यांच्यावर पुण्यातील भोसरी येथील जमीन घोटाळ्याचे आरोप केले. परिणामी त्यांना महसूल मंत्रीपद सोडावे लागले. तिथूनच त्यांचा विजनवास सुरू झाला होता. नंतरचा काळ ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना लोकसभेची उमेदवारी दिली गेली आणि त्या विजयी देखील झाल्या. मात्र विधानसभेच्या वेळेस नाथाभाऊंना उमेदवारी न देता पक्षाने त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली. त्यांचाही पराभव झाला. त्यामुळे नाथाभाऊ जास्तच दुखावले होते.
या सर्वच प्रकारामुळे व्यथित झालेल्या नाथाभाऊंनी २०२० मध्ये भारतीय जनता पक्ष सोडण्याचे ठरवले आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी झाले. योगायोगाने लगेचच शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेत स्थान दिले आणि विरोधी पक्षाचा आमदार म्हणून पुन्हा एकदा त्यांनी विधान परिषद गाजवणे सुरू केले होते.
या निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्यामुळे त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांना भाजप उमेदवारी देणार का यावर चर्चा सुरू होती. मात्र भाजपने रक्षा खडसेंनाच पुन्हा उमेदवारी दिली. याचवेळी रक्षा खडसे यांच्या विरोधात नाथाभाऊंनी जळगाव लोकसभा क्षेत्रातून लोकसभेची निवडणूक लढवावी अशी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची अपेक्षा होती. मात्र प्रकृतीचे कारण देत सुनेविरुद्ध लढण्याचे नाथाभाऊंनी नाकारले. तेव्हापासूनच नाथाभाऊंच्या भाजप पुनरागमनाची चर्चा सुरू झाली होती. दरम्यानच्या काळात नाथाभाऊ दिल्लीला जाऊन भाजप श्रेष्ठींना भेटले आणि आता आपण भाजपात परत येणार असल्याचे त्यांनी स्वतः जाहीर केले आहे. अर्थात या पुनरागमनामागे नेमक्या काही अटी ठरल्या आहेत का हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. कदाचित नाथाभाऊंनी विनाअटही भाजपमध्ये प्रवेश घेतला असू शकतो.
नाथाभाऊंनी भाजप सोडण्यामागे त्यांचे आणि भाजपचे महाराष्ट्रातील वजनदार नेते देवेंद्र फडणवीस आणि त्या खालोखाल जळगाव मधील वजनदार नेते गिरीश महाजन यांच्याशी न पटणे हे देखील प्रमुख कारण होते. आज पक्षात परत आल्यावर या दोघांशीच त्यांना पटवून घ्यावे लागणार आहे. अर्थात बरीच वर्ष राजकारणात काढल्यामुळे नाथाभाऊ तेवढे प्रगल्भ निश्चित आहेत. मात्र नाथाभाऊ भाजपमध्ये परत आले तर रावेर मतदार संघात त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांचा विजय निश्चित होणार आहे. त्याचबरोबर खानदेशातील इतर मतदारसंघांमध्ये देखील त्यांचा प्रभाव राहणार आहे. नाथाभाऊ हे लेवा समाजाचे नेते आहेत. खानदेशात लेवा समाजाचे मतदार मोठ्या संख्येत आहेत. त्यामुळे त्यांच्या पुनरागमनाचा पक्षाला फायदाच होणार आहे.
नाथाभाऊंचे वय आणि त्यांची प्रकृती लक्षात घेता आता भाजपचे कोणतेही महत्वाचे संघटनात्मक पद किंवा मंत्रिमंडळातील महत्त्वाचे स्थान त्यांना कितपत झेपेल हे आज सांगणे कठीण आहे. अशावेळी पक्ष त्यांना महाराष्ट्र बाहेरच कुठेतरी एखादे कमी त्रासाचे जबाबदारीचे पद देऊन त्यांचा सन्मान करेल अशीही चर्चा सुरू आहे. अर्थात पक्षश्रेष्ठींच्या मनात काय आहे ते आज सांगणे कठीण आहे.
असे असले तरी नाथाभाऊंनी स्वगृही परतण्याचा हा घेतलेला निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे. त्यांनी लहानपणापासून संघ जनसंघ आणि भाजप या संस्कारातच वाटचाल केलेली आहे. त्यामुळे काँग्रेसी संस्कृतीत ते रुळणे शक्य नव्हते. अशावेळी त्यांनी पुन्हा एकदा आपल्या विचाराधारेसोबत येणे हे केव्हाही उचित ठरणार आहे. त्यामुळेच त्यांच्या या निर्णयाचे बित्तंबातमी स्वागत करीत आहे. आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *