१५० खाटांचे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल; गरजूंना मिळणार मोफत शस्त्रक्रियेसह उपचार
ठाणे : महापालिका क्षेत्रात आणखी एक कॅशलेस रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. घोडबंदर परिसरातील नळपाडा येथे १५० खाटांचे सर्व सोयीसुविधांनी युक्त असे हे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे बांधकाम पालिकेने केले आहे. हे रुग्णालय एका सेवाभावी संस्थेला चालवण्यासाठी देण्यात येणार आहे; मात्र महात्मा जोतिबा फुले योजनेंतर्गत येथे रुग्णसेवा देण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांवर महागड्या शस्त्रक्रियेसोबतच उपचारही मोफत मिळणार आहेत. या रुग्णालयाचा उपयोग लोकमान्यनगर, वर्तकनगर, भीमनगर, शिवाई नगर, उपवन, येऊर येथील आदिवासी पाडे, वसंत विहार, घोडबंदर रोड व आजूबाजूच्या परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. आचारसंहिता लागण्याआधी त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
घोडबंदर रोड नळपाडा येथील हॉस्पिटलची इमारत महापालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आली आहे, तसेच सर्व आधुनिक मशिनरी व हॉस्पिटल सुरू करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय उपकरणे खरेदीसाठी आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्यामुळे २५ कोटींचा विशेष निधी मंजूर झाला आहे. या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापन एका सेवाभावी संस्थेला देण्यात आले आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची ज्यांना माहिती आहे, अशा संस्थेला हॉस्पिटलचे व्यवस्थापन देण्यात आले आहे. सर्व स्टाफ व हॉस्पिटलचे व्यवस्थापन ही संस्था सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांप्रमाणे सांभाळणार आहे. ज्या शस्त्रक्रियेसाठी बाहेर लाखो रुपये लागतात, अशा मोठ्या सर्जरी येथे मोफत होणार आहेत. गरजूंना औषधेही मोफत देणार आहेत. २४ तास हॉस्पिटल गरजूंना सेवा देणार आहे. हे कॅशलेस हॉस्पिटल असल्याने रुग्णाच्या साध्या तपासणीपासून डॉक्टरांचे कन्सल्टिंग, पुढे आवश्यक असल्यास ऑपरेशन, त्यानंतर पुन्हा पुढील सर्व उपचार अशा सर्व आरोग्य सुविधा मोफत मिळणार आहेत.
राज्यातील तिसरे कॅशलेस रुग्णालय
ठाणे शहरातील हे हॉस्पिटल लोकांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. ठाणे शहरातील दुसरे तर महाराष्ट्र राज्यातील तिसरे सरकारी कॅशलेस हॉस्पिटल आहे. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत हे कॅशलेस हॉस्पिटल चालणार आहे.
चाचण्यांपासून शस्त्रक्रियेपर्यंत सुविधा
कार्डिओलॉजी, अँजिओप्लास्टी, बायपास हृदय शस्त्रक्रिया, ब्लॉक बदलणे, पेसमेकर बसवणे अशा मोठ्या शस्त्रक्रिया, कॅन्सरवरील उपचार त्याचप्रमाणे इस्पितळात रक्ततपासणी, हेमेटोलॉजी, बायोकॅमिस्ट्री चाचणी, ईसीजी, सोनोग्राफी, २डी इको, होल्टर, पीएफटी, एक्स-रे, कॅट्सकॅन, सीटी स्कॅन स्क्रिनिंग, यूरो शस्त्रक्रिया, न्यूरो सर्जरी जसे की कॅनिओटॉमी, हेमॅटोमा इव्हॅक्युएशन, स्पाइन सर्जरी, लॅमिनेक्टॉमी, स्त्रीरोग शस्त्रक्रिया जसे की हिस्टेरेक्टॉमी, डोके आणि मानेचा कर्करोग, स्त्रीरोग कर्करोग, पोटाचा कर्करोग सारख्या ऑन्को शस्त्रक्रिया येथे होणार असून या सुविधा विनामूल्य (कॅशलेस) स्वरूपात पिवळ्या, केशरी तसेच शुभ्र शिधापत्रिकाधारकांसाठी येथे सरकारी योजनेंतर्गत उपचार उपलब्ध होणार आहेत.
००००
