गुढीपाडवा विशेष
डॉ. सदानंद मोरे
गुढ्या उभारणे हा आनंदोत्सव साजरा करण्याचा एक मार्ग आहे. आपल्याकडे बरेच सण साजरे होतात. प्रत्येक सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. गुढ्या उभारणे हे चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवसाचे अनोख्या पद्धतीने साजरीकरण असते असे म्हणता येईल. गुढी उभारण्याची रुढी आजही तितक्याच हर्षोल्हासात पार पडते. सध्या या साजरीकरणाला वेगळे स्वरुप मिळत आहे. मात्र उत्साह तोच आहे.
गुढी उभारुन, घरात गोडाधोडाचे जिन्नस रांधून, आप्तस्वकियांच्या भेटी घेत त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन साजरा होणारा गुढीपाडवा हा अतिशय सुंदर प्रारंभ आहे, यात शंका नाही. हिंदू नववर्षदिन म्हणून हा दिवस परंपरेनुसार साजरा होत असला तरी अलिकडे त्यातही नवता दिसून येते. त्यात प्रत्येक समाज बदलत्या परिमाणांनुसार नवनव्या गोष्टींची भर घालत असतो. त्यातून बदलत्या समाजाचे प्रतिबिंब दिसत असते. विचार आणि आचारातील बदलांचा तो आरसा असतो. म्हणूनच पूर्वीपेक्षा आजच्या गुढीपाडव्याच्या साजरीकरणाचे स्वरुप काहीसे वेगळे बघायला मिळते. पण असे असले तरी, त्यातला उत्साह अजिबात कमी नसतो. आधुनिक जगाची ओळख झालेला समाज त्यातील काही तत्त्वे अंगिकारत जगत असला तरी परंपरेने सांगितलेली मूल्येही तितक्याच तळमळीने जपतो. गुढीपाडव्याच्या दिवशी परंपरा आणि नवतेचा असा सुंदर संगम बघायला मिळतो.
यंदाच्या गुढीपाडव्याला एका वेगळ्या अर्थाने महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला आता ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. महाराष्ट्रात दोन शककर्ते होवून गेले. एक शालिवाहन आणि दुसरे शिवाजी महाराज. या अर्थाने यंदाचा गुढीपाडवा या दोघांमधील संगती सांगणारा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
या कालगणनेला आपण शालिवाहन शक म्हणतो. शालिवाहन हा सातवाहन कुळातला राजा होता. तो महाराष्ट्रातला होता. या राजवंशातील राजांचे घोडे उत्तर आणि दक्षिणेत दौड मारणारे होते. सातवाहन कुळातील प्रत्येक राजाने उत्तम पद्धतीने साम्राज्यविस्तार केला होता. इतकेच नव्हे, तर त्यांचा दबदबा रोमन साम्राज्यापर्यंत पोहोचला होता. सातवाहनांच्या काळात महाराष्ट्राने कमालीची समृध्दी आणि संपन्नता अनुभवली. त्या काळात महाराष्ट्रातील पैठण येथून रोमन साम्राज्यामध्ये रेशमी वस्त्रांचा व्यापार होत असे. हा साधारण इसवी सनपूर्व २०० आणि इसवी सनानंतर २०० वर्षांचा काळ होता. म्हणजेच सातवाहनांच्या कादकिर्दीतही सुमारे ४०० वर्षं महाराष्ट्र समृद्धीच्या शिखरावर होता. महाराष्ट्रीयन लोक देशावरच नव्हे तर जागतिक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी बजावत होते.
याच काळात आपल्याकडे उच्च प्रतीच्या साहित्य-कलांची निर्मिती झाली. गाथा सप्तशती, बृहदकथा अशी उदाहरणे वानगीदाखल देता येतील. अशा परिस्थितीमध्ये शक राजांनी भारतावर आक्रमण केले. ते महाराष्ट्रावरदेखील चालून आले. शालिवाहन राजाने त्यांचा पराभव केला. त्या विजयाचे स्वागत गुढ्यातोरणे उभारून केले गेले आणि आजही दारी गुढ्या उभारुन त्या विजयी क्षणांच्या स्मृतींचे जतन केले जाते. विजयप्राप्तीच्या या दिवशी शालिवाहनाने नवी कालगणना सुरु केली. यालाच आपण शालिवाहन शक म्हणतो. आधी उल्लेख केल्याप्रमाणे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनापासून राजांनी नवी कालगणना सुरु केली. या शकाचा उल्लेख आपण ‘शिवशक’ म्हणून करतो. एखाद्याला आपण शककर्ता म्हणतो तेव्हा त्याने काळाला वळण दिलेले असते. काळावर स्वत:ची मुद्रा उमटवलेली असते. महाराष्ट्रातल्या या दोन्ही राजांनी काळावर अमीट मुद्रा उमटवली आहे. म्हणूनच या दोन्ही कालगणना आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत.
आज शिवशक वापरात नाही, मात्र शिवरायांच्या काळात आणि त्यानंतरची काही वर्षं ही कालगणना वापरात होती. पुढे मराठी राज्याचा विस्तार झाला. ते उत्तरेपर्यंत विस्तारले. तेव्हा त्यांना नाईलाजास्तव भारतामध्ये रुढ असलेली कालगणना स्वीकारावी लागली. त्यामुळेच पुढे पुढे मुघलांची कालगणना स्वीकारली गेली. इथे राजकीय आणि प्रशासकीय बाबी लक्षात घेऊन कालगणनेचा स्वीकार केला गेला. त्या काळाच्या कागदपत्रांमध्ये दोन अथवा तीन कालगणांचा उल्लेख आढळतो. आजही आपण व्यावहारिक आयुष्यात युरोपियन कालगणनेचा अवलंब करतो तर सांस्कृतिक उपचारांसाठी शालिवाहन शक अवलंबले जाते.
गुढीपाडव्याच्या दिवशी गुढ्या-तोरणे उभारली जातात. गुढ्या उभारणे हा आनंदोत्सव साजरा करण्याचा एक मार्ग आहे. आपल्याकडे बरेच सण साजरे होतात. प्रत्येक सण अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. गुढ्या उभारणे हे चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवसाचे अनोख्या पद्धतीने साजरीकरण असते असे म्हणता येईल. गुढी उभारण्याची रुढी आजही तितक्याच हर्षोल्साहात पार पडते. नवे वर्ष म्हटले की नवे संकल्प सोडले जातात. सरत्या वर्षात झालेल्या चुका टाळून आणि अपूर्ण कामांचा मागोवा घेऊन नव्याने कामाचा आरंभ करण्याचे संकल्प सोडले जातात. मुख्य म्हणजे गुढीपाडवा वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असणारा मंगल दिन आहे. म्हणूनच हा मुहूर्त साधत अनेक शुभकार्यांचा आरंभ होतो. या मुहूर्ताचं वैशिष्ट्य म्हणजे दिवसभरातील प्रत्येक पळ, प्रत्येक प्रहर अत्यंत शुभ असतो. एरवी एखादे शुभकार्य हाती घेताना ग्रहानुकूलता रहावी या हेतूने सुमुहूर्त बघावा लागतो. मात्र या दिवशी त्याची गरज रहात नाही. कारण प्रत्येक क्षण चांगली फलश्रुती देणारा असतो. आपल्याकडे काही मुहूर्त काही खास कामांसाठी योजलेले आहेत. उदाहरणार्थ, पूर्वी दसर्याच्या मुहूर्तावर राजे-रजवाडे मोहिमांसाठी बाहेर पडत असत. सीमोल्लंघन करण्याचा हा यथोचित मुहूर्त साधला जात असे. या दिवशी मराठी फौजा साम्राज्यविस्ताराच्या हेतूने बाहेर पडत. या धर्तीवर पाडव्याच्या मुहूर्तावर पूर्वी विशिष्ट काम हाती घेतले जात असल्याचे कोणतेही संदर्भ आढळत नाहीत. पण बदलत्या जमान्यात नवीन संकल्प सोडण्यासाठी हा मुहूर्त साधण्यास काहीच हरकत नाही.
हा दिवस आनंदाचा आहे, उत्साहाचा आहे. या दिवशी मराठी माणसाने गाजवलेल्या पराक्रमाचे स्मरण व्हायला हवे. किंबहुना, हे स्मरण करुन देणारा हा दिवस आहे. आपण मराठी माणसे कुठल्याही बाबतीत मागे राहणारी नाहीत. महाराष्ट्रीयन माणसाने जगाच्या पटलावर आपले कर्तृत्त्व सिद्ध केले आहे. १९१९ मध्ये यदुनाथ सरकारांनी शिवचरित्र लिहिले. यदुनाथ सरकार हे बंगालमधले साहित्यिक पण त्यांनी शिवचरित्राचा सखोल अभ्यास केला, मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास केला. त्यावेळी त्यांनी मराठ्यांच्या अपार कर्तृत्त्वाचा आवर्जून उल्लेख केला आहे. त्यांनी लिहून ठेवले होते, आजमितीला मराठे भारतात क्रमांक एकवर आहेत. आपली पूर्ण क्षमता वापरली तर ते जगावर अधिराज्य गाजवू शकतील. मराठ्यांनी काही गुणांचं वर्धन केले तर आणखी शंभर वर्षात जग पादाक्रांत करु शकतील. एका द्रष्ट्याने मराठ्यांच्या कार्यकर्तृत्त्वाला दिलेली ही पावती होती. हे मराठ्यांच्या कलागुणांचे केलेले परीक्षण होते. पण खेदजनक बाब म्हणजे समस्त मराठीजनांनी त्यांचा पराभव केला. त्यांच्या या विधानाला आता शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आपण गुणवर्धनाकडे लक्ष दिले नाही. उलट, आपल्यातील अवगुणच वाढत गेले. म्हणून या सणानिमित्ताने एखादा संकल्प करायचा असेल तर तो भारतात आणि जगात नवे स्थान निर्माण करणे असा असायला हवा.
मराठी माणसाने गतवैभव परत मिळवण्याचा संकल्प करायला हवा. सातवाहन राजांनी जगाच्या इतिहासाला नवे वळण दिले असे इतिहासकार सांगतात. इतिहासात त्यांच्या पराक्रमाची नोंद आहे. या सातवाहनांनी रोमन साम्राज्याला आपली दखल घेण्यास भाग पाडले. त्या काळी अत्यंत मोजक्या साधनांनिशी निर्माण केलेली ही ओळख आपल्या पूर्वजांच्या विपूल क्षमतांची ग्वाही देणारी ठरते. आज तर आपण सर्व साधनांनिशी संपन्न आहोत. जग जवळ आले आहे. असे असताना स्वत:च्या क्षमता वाढवून जगात उल्लेखनीय कामगिरी करण्याचा निर्धार हा एक यथोचित संकल्प ठरेल. हा संकल्प तडीस न्यायचा असेल तर जातीभेदाच्या भिंती जमीनदोस्त करुन सर्व समाजाने एक होणे गरजेचे आहे. सगळ्या जातींनी एकत्र येऊन काम केले तर अवघडातील अवघड काम सहज पार पडते, हे शिवकालाने अनुभवले आहे. सगळ्या जाती एकत्र आल्या म्हणूनच शिवरायांच्या काळात आपण पुढे जाऊ शकलो.
आज नेमके हेच हरवत आहे. जातीपातीच्या भिंती नव्या जोमाने उभारल्या जात आहेत. समाजामध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. यकश्चित राजकारणापोटी आणि वैयक्तिक स्वार्थापोटी जातीपातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक होत आहे. वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी समाजात चुकीची विचारधारा पसरवण्याचा प्रयत्न होत आहे. ही सगळी परिस्थिती मराठ्यांचा पूर्वलौकिक झाकोळून टाकण्यास कारणीभूत आहे. ही विचारधारा अमान्य असणारे बुद्धिजीवी मग परदेशात जातात आणि तिथे आपल्या कर्तृत्त्वाच्या गुढ्या उभारतात. हे थांबायला हवे. महाराष्ट्रातील बुद्धिवैभव राज्यउभारणीच्याही कामी यायला हवे. मराठी माणसाने एकदिलाने राज्य उभारणीसाठी उभे रहायला हवे. सगळ्यांचे हात लागले तर उभारलेल्या गुढीकडे वाईट नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही.
(अद्वैत फीचर्स)