अमित शाहंच्या घोषणेने राजकीय भूकंप
स्वाती घोसाळकर
मुंबई: महाराष्ट्रात यंदा सरकार येणार ते भाजपाप्रणीत महायुतीचेच, मात्र राज्यात 2029 सालच्या निवडणुकीत एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायची असा २०२९ चा नारा भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिल्यानंतर राजकीय भूकंप झाला आहे. भाजपासोबत असलेल्या घटक पक्षांमध्ये याबाबात लगेचच प्रतिक्रीया उमटल्या आहेत तर विरोधकांनीही हा एकला चलोरेचा धागा पकडत भाजपावर टिका करण्याची संधी साधून घेतली.
आगामी विधानसभेच्या पार्श्वभुमीवर अमित शाहांनी मुंबईतील भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आणि त्यांना राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी मार्गदर्शन केलं. भाजपच्या कार्यकर्त्यांनी बूथ स्तरावर सक्रिय रहावे, प्रत्येक बूथवर भाजपचे 10 कार्यकर्ते असावेत अशा सूचना अमित शाहांनी दिल्या.
महाराष्ट्रात एकाच पक्षाचे सरकार अशक्य- अजित पवार
देशातील इतर राज्यांमध्ये एका पक्षाचं सरकार येईल, पण महाराष्ट्रात एकाच पक्षाचं सरकार येऊ शकत नाही असं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार म्हणाले आहेत.
अमित शाहांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, सगळ्यांनाच आपापला पक्ष वाढवायचा आहे. पण महाराष्ट्रामध्ये एकाच पक्षाचं सरकार येऊ शकत नाही. महाराष्ट्राची राजकीय भौगोलिक परिस्थिती वेगळी आहे. इतर राज्यांमध्ये एका पक्षाचे सरकार येऊ शकतं. मात्र महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. 1985 नंतर चाळीस वर्षात राज्यात एका पक्षाचे सरकार कधीच आलं नाही.
कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी अमित शाहांनी हे वक्तव्य केलं असेल. त्यांना त्यांचा पक्ष सिंगल लार्जेस्ट पक्ष करण्याचा अधिकार आहे असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार तिसऱ्या आघाडीमध्ये जातील असं काहीजणांकडून म्हटलं जातं. त्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले की, मी तिसरा आघाडीचा चेहरा होईल असं सांगितलं जातं. पण हे ऐकून आमची करमणूक होते. आमचे आम्हालाच कळत नाही, आमची ब्रेकिंग न्यूज तिथे चालत असते. तिसरी आघाडी होईल, चौथी देखील होईल. त्यांचे उमेदवारी त्यांनी जाहीर केले आहेत.
