लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची घोषणा
परळी: महिलांच्या सक्षमीकरणासाठी व आत्मसन्मानासाठी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही. पुढील पाच वर्ष ही चालू राहील…तसेच भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे तीन हजार रुपये दहा ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात अडव्हान्स जमा होतील असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परळी येथे जन सन्मान यात्रेच्या सभेप्रसंगी दिला.
मंगळवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेचे परळी शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर येथील वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या लाडकी बहिणी व नागरिकांच्या संवाद सभेत अजितदादा बोलत होते. याप्रसंगी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसमान यात्रेचे शहरात वाजत गाजत स्वागत करण्यात आले त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी विरोधकांचा समाचार घेतला. भाजप -शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुती सरकारने गोरगरिबांच्या कल्याणासाठी, शेतकरी, शेतमजुरांच्या हितासाठी, महिला-मुलींसाठी, होमगार्डसाठी व समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यापुढेही विकासासाठी केंद्र सरकारची मदत घेण्यात येईल.बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. बीडला विमानतळ करण्यात येईल त्यामुळे जिल्ह्यात उद्योगधंदे वाढतील व बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल”, असा विश्वास ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.
दरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांच्या रकमेतून स्वतःचा व्यवसाय सुरू करून एक आठवड्यात १२ हजार रुपयांचा नफा मिळवणाऱ्या परळी येथील नेहरु चौकातील अक्षरा अक्षय शिंदे या महिलेचा अजित पवार व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. आर्टिफिशियल वटवृक्ष तयार करण्याचा व्यवसाय अक्षरा शिंदे यांनी सुरू केला आहे. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणातून त्यांचे कौतुक केले. आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी केले.
