खेद कितीही दाटून आला,
आजपासुनी सुटेल साथ |
नव्या दमाचे नवसंवत्सर,
सोबत करेल धरुनी हाथ ||
संगत असतानाही माझी,
भलेबुरे जे घडले ते ते |
कुणा लाभले सोबतीचे बळ,
कुणी तोडले अपुले नाते ||
घडले ते ते अटळही होते,
समजून घ्यावे जरा मलाही |
दु:ख पाहूनी तुमचे, झाली
माझ्या अंगाची लाही ||
बाष्कळ बोलून वेळ दवडती,
कोण तयांना अडवील? |
गीता वाचून गाढवापुढे,
कोण तयांना पढवील? ||
शिव्या-शाप मज देऊ नका,
वा ओवी सुद्धा गाऊ नका |
दोष त्यात माझा न, जाई तो
‘काळ’ भाव खाऊन फुका ||
उगवत्यास जन नमतील सारे,
मावळत्या ना भाग्य मिळे |
रीत जगाची अशीच आहे,
दोष कुणाशी कसा जुळे? ||
येणाऱ्याचे स्वागत करण्या,
गुढ्या-तोरणे बांधा दारी |
दु:ख सोबती नेतो, सजवून
आनंदे जीवन-वारी ||
वर्षभरासाठीच आपली,
सुख-दु:खाची होती गाठ |
नवसंवत्सर घेऊन येईल,
सौख्याचे भरभरून ताट ||
|| गुढीपाडव्याच्या आणि नवसंवत्सराच्या मनःपूर्वक
शुभेच्छा ||
रचना- विजय मडव
बोरीवली (पूर्व), मुंबई. (लेखक ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी आहेत)