शालेय शिक्षण विभागाच्या शिक्षकांसाठी झालेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत जिल्हास्तरावर प्रथम तर राज्यपातळीवर मिळवला तिसरा क्रमांक
ठाणे : शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत प्रा. प्रकाश राजाराम सुर्वे यांनी संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रथम आणि राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे .सेंट जॉन दि बाप्टिस्ट हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ,ठाणे या ठिकाणी कार्यरत असलेले सहाय्यक शिक्षक प्रा.सुर्वे प्रकाश राजाराम यांना हा पुरस्कार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला .रोख ३० हजार रुपये ,सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुणे येथे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या महात्मा फुले सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हे पुरस्कार वितरित करण्यात आले.यावेळी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले, आजच्या आधुनिक काळामध्ये ऑनलाइन शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.आधुनिक तंत्रज्ञानामुळे डिजिटल शिक्षणाला वेगळेच महत्व प्राप्त झाले आहे.शिक्षक आणि विद्यार्थी या दोन्ही घटकांना प्रेरित करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी ही दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित केली होती.नवीन शैक्षणिक धोरणात आधुनिक तंत्रज्ञानाला महत्त्व देण्यात आले आहे.शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञान अवगत केल्यास शिक्षणाचा दर्जा वृद्धिंगत होईल. तंत्रस्नेही शिक्षकांमुळे भविष्यात दर्जेदार आणि गुणवंत विद्यार्थी घडतील ,असा आशावाद शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या या दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेच्या राज्यस्तरीय बक्षीस वितरणप्रसंगी ते बोलत होते.यावेळी शालेय शिक्षण विभाग प्रधान सचिव आय ए कुंदन, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, शिक्षण संचालक राहुल रेखावार, संपत सूर्यवंशी, महेश पालकर ,आयटी विभागाचे सोनावणे , मुळये आदि मान्यवर उपस्थित होते .यावेळी विविध गटातील विजेत्या ८४शिक्षकांना पुरस्काराने गौरविण्यात आले.या स्पर्धेसाठी प्रथम पुरस्कार रोख ५० हजार रुपये, द्वितीय ४० हजार रुपये तर तृतीय पुरस्कारासाठी ३० हजार रुपये तसेच सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देण्यात आले. राज्यातील शिक्षकांमध्ये तंत्रस्नेही चळवळ निर्माण व्हावी, शिक्षकांमध्ये निकोप स्पर्धा निर्माण होऊन ई साहित्य निर्मितीची चळवळ उभी राहावी यासाठी राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक ,माध्यमिक, उच्च माध्यमिक ,डीएड शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी शालेय शिक्षण विभागातर्फे व्हिडिओ निर्मिती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .अशा स्पर्धेतून दर्जेदार विद्यार्थी घडतील असा विश्वास राज्य शिक्षण सचिव कुंदन यांनी व्यक्त करून उपस्थित पुरस्कार विजेत्या शिक्षकांचे कौतुक केले.
