अनिल ठाणेकर

 

ठाणे : शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याची स्थिती निर्माण झाल्याने ठाणे शहरातील गर्दुल्ल्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची दखल पोलीस प्रशासनाने गांभीर्याने घ्यावी, अशी आग्रही मागणी धर्मराज्य पक्षाचे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे आपल्या पत्राद्वारे केली आहे.
मुंबईचे धाकटे भावंडं अशी ओळख असलेल्या, ठाणे शहराच्या घोडबंदर रस्त्यावरील आझादनगर-ब्रह्मांड परिसरात गर्दुल्ल्यांनी हैदोस घातला असून, त्यांच्या हल्ल्यात एका महिन्यात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी, तितक्याच संतापजनक घटना घडलेल्या आहेत. ब्रह्मांड परिसर हा, गर्दुल्ल्यांच्या दहशतीखाली असून, पोलीस प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप, स्थानिक नागरिकांनी केल्याचे वृत्त प्रसिद्धीमाध्यमांद्वारे प्रकाशित झालेले आहे. गेल्या काही वर्षांत ठाणे शहराचे नागरिकीकरण मोठ्याप्रमाणात झालेले आहे. यामध्ये बहुमजली निवासी संकुलांबरोबरच, अनधिकृत झोपडपट्ट्यादेखील फोफावल्या आहेत. याच झोपडपट्ट्यांमध्ये ठाणे शहराच्या बाहेरुन आलेल्या नागरिकांचा समावेश असून, त्यामध्ये समाजकंटकांची संख्या चिंताजनक अशी आहे. परिणामी, कोणताही कामधंदा नसलेले आणि व्यसनांच्या आहारी गेलेले हे गर्दुल्ले, रात्री-बेरात्री कामावरुन घरी येणाऱ्या नागरिकांवर हल्ला करतात. एकट्या-दुकट्या व्यक्तीस हेरुन, त्याच्याकडील पैसे हिसकावत, जीवघेणा हल्ला करण्याची मजल या गर्दुल्ल्यांची होत असते. यामुळे लहान मुले, महिला, तरुण मुली आणि ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत. आपले आई-वडील सुखरुप घरी येतील की नाही, अशी काळजी मुलांना वाटते. कामावरुन घरी येणारे चाकरमानी जीव मुठीत धरुनच घरी येतात. याच पार्श्वभूमीवर, आझादनगर-ब्रह्मांड परिसरातील दोन तरुण मुलांच्या निर्घृण हत्यांच्या घटना घडत आहेत. ठाणे शहरातील स्कायवॉक, निर्जन-स्थळे, पडक्या इमारती व अर्धवट अवस्थेतील बांधकामे ही ठिकाणे गर्दुल्ल्यांसाठी सोयीची असल्याकारणाने, अशा सर्व ठिकाणी शोधमोहीम राबवून, सामाजिक हितास आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोकादायक ठरणाऱ्या अशा समाजकंटक गर्दुल्ल्यांस तत्काळ चतुर्भुज करुन, त्यांच्यावर कठोर-कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, आयुक्तांना पाठविलेल्या पत्रात केली आहे. आजमितीस मुंबईसह, महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. विशेषतः या लैंगिक अत्याचाराला चिमुरड्या बालिका बळी जात आहेत. सबब, समाजकंटकांवर कायद्याचा कोणताही धाक उरलेला नसल्याचे, पंडित यांनी आपल्या पत्रात खेदाने नमूद केले आहे. मध्यंतरीच्या काळात, अमलीपदार्थांच्या खुलेआम विक्री व सेवानाबद्दलचे वृत्त, प्रसिद्धीमाध्यमांतून प्रकाशित झाल्यानंतर ठाणे शहरात एकच खळबळ उडाली होती. त्याच पार्श्वभूमीवर, आझादनगर-ब्रह्मांड येथील घटना घडल्यामुळे, पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. ठाणे शहरात अनेक ठिकाणी विकासकामे सुरु आहेत; तर, काही ठिकाणी इमारतींचे बांधकाम अर्धवट अवस्थेत आहे. अशी ठिकाणे ही, गर्दुल्ल्यांसाठी मोक्याची असतात. शिवाय, स्कायवॉक तर त्यांच्यासाठीच बांधण्यात आल्याच्या अविर्भावात गर्दुल्ले वावरत असतात. तरी, याप्रकरणी पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेत, ठाणे शहरातील गर्दुल्ल्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी ‘धर्मराज्य पक्षा’चे सहसचिव नरेंद्र पंडित यांनी, ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे केली आहे.
00000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *