वाहतूक पोलिसांचे कल्याणकरांना आवाहन
कल्याण, ता. ६ (वार्ताहर) : वाहतूक कोंडीने कल्याणकर त्रस्त झाले आहेत. त्यामुळे सायंकाळच्या वेळी आवश्यकता नसल्यास बाहेर पडू नका, तसेच, दुर्गाडी किल्ल्यावर दर्शनासाठी स्वतःच्या वाहनाऐवजी रिक्षा किंवा ओला टॅक्सीचा वापर करण्याची विनंती कल्याण शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी कल्याणकरांना केली आहे. नवरात्रोत्सवात वाहतूक कोंडीमुळे कल्याण पश्चिमेतील मुख्य रस्ते अक्षरशः ठप्प पडलेले पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याण शहर वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश शिरसाठ यांनी आवाहन केले आहे.
दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्रोत्सवामुळे गोविंदवाडी बायपास हा सायंकाळी पाच ते रात्री बारा वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद ठेवला आहे. परिणामी, या मार्गावरील वाहतूक ही पत्रीपूल, बैलबाजार, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सहजानंद चौक, लाल चौकीमार्गे दुर्गाडी चौक अशी सुरू आहे; मात्र या मार्गावर प्रचंड मोठ्या संख्येने वाहने येत असल्याने कल्याण शहरातील आग्रा रोडवर वाहतुकीचा प्रचंड ताण येत आहे. ज्यामुळे कल्याण पश्चिमेतील या मुख्य मार्गावर सायंकाळीही अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी होत आहे.
नागरिकांनी सायंकाळच्या वेळी शक्यतो बाहेर पडू नये, जेणेकरून ते कोणत्याही वाहतूक कोंडीमध्ये अडकणार नाहीत. दुर्गाडी किल्ल्यावरील देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी स्वतःचे वाहन आणू नये. त्याऐवजी ऑटो रिक्षा किंवा ओला टॅक्सीचा वापर करावा, असे आवाहन राजेश शिरसाठ यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
