ठाणे, ता. ६ : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीसह मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी युक्त्या लढवल्या जात आहेत. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागल्याचे दिसून येत आहे. ठाणे-पालघर जिल्ह्यातील काही जागांवर लक्ष केंद्रीत केले आहे. अशातच ठाणे विधानसभेत मागील निवडणुकीत मिळालेल्या मतांचा विचार करून यंदाही या जागेवर आपला विजय निश्चित असल्याचा दावा करत तरुण मतदारांना आपलेसे करण्यासाठी मनसेने आरोग्य कार्डची खेळी खेळत आहे. आतापर्यंत पाच हजार तरुणांना त्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मनसेने बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. ठाणे-पालघर जिल्ह्यावर मनसेने आपला फोकस वाढवला आहे. या दोन्ही जिल्ह्यांतील २४ मतदारसंघांपैकी सात मतदारसंघांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील ठाणे, बेलापूर, कल्याण ग्रामीण, कल्याण पश्चिम, भिवंडी ग्रामीण, शहापूर आणि पालघरमधील बोईसर, पालघर या ठिकाणी अधिक फोकस करण्यावर भर देत आहेत. त्यानुसार पक्ष बांधणी करण्याबरोबर पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात आहे. मागील निवडणुकीत ठाण्याचा विचार केल्यास मनसेचे अविनाश जाधव आणि भाजपचे संजय केळकर यांच्यात थेट लढत झाली होती. त्या निवडणुकीत पडलेल्या मतांची गोळाबेरीज करून आगामी विधानसभा निवडणुकीत ठाणे विधानसभेसाठी मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. त्यानुसार मतदारापर्यंत पोहचण्यासाठी विभागवार बैठका घेतल्या जात आहेत. स्थानिक पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे. यात शाखाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष यांच्या खांद्यावरही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती मनसेच्या सूत्रांनी दिली.
आरोग्य कार्डची खेळी
ठाणे विधानसभा मतदारसंघात अविनाश जाधव हे मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. यासाठी प्रत्येक विभागात शाखाध्यक्ष, उप शाखाध्यक्षांची फौज उभी केली आहे. त्यांच्यामार्फत मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि मनसेच्या वतीने करण्यात येत असलेल्या कामांची माहिती देण्यात येत आहे. अशातच आता, तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसेच्या वतीने आरोग्य कार्डची खेळी खेळली आहे. गोविंद पथकांसह ढोल ताशा पथकातील सुमारे पाच हजार तरुणांना या कार्डचे वाटप करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. एखाद्याचा अपघात झाल्यास अथवा आजार जडल्यास या आरोग्य कार्डच्या माध्यमातून मोफत उपचार मनसेच्या वतीने करण्यात येणार असल्याचा दावाही करण्यात येत आहे. त्यामुळे आगामी ठाणे विधानसभेत मनसेकडून आरोग्य कार्डची खेळी खेळली जात असल्याचे बोलले जात आहे.
0000
