मुरूड ः पावसाळ्यात खवळलेला समुद्र, वादळी वाऱ्यासह येणाऱ्या उंच लाटांमुळे कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी जंजिरा किल्‍ला पर्यटकांसाठी बंद ठेवला जातो. वाढलेले गवत, झाडे, वेली, कचरा उचलून परिसर स्‍वच्छ करण्यात आल्‍यावर जंजिरा किल्‍ला रविवारपासून पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. त्‍यामुळे राजपुरी जलवाहतूक संस्था, पर्यटक व स्थानिक व्यावसायिकांना दिलासा मिळाला असून पर्यटन व्यवसायावर आधारित उद्योग-व्यवसायाला गती येण्याची शक्‍यता आहे.

साधारण १ सप्टेंबर रोजी जंजिरा किल्ला सुरू होणे अपेक्षित होते; मात्र सुरक्षेच्या कारणामुळे पुरातत्त्व विभागाने एक महिन्यापेक्षा अधिक काळ पर्यटकांना रोखून धरले होते; मात्र आता संपूर्ण किल्ल्याची साफसफाई झाली असून रविवारी पुरातत्त्व विभागाने जंजिरा किल्ल्याचे दरवाजे बहुउद्देशीय कर्मचारी प्रकाश घुगरे यांच्या हस्ते उघडले. पर्यटकांची वर्दळ वाढेल, या अपेक्षेने स्थानिक व्यावसायिकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.

जंजिरा किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी देश-विदेशातून लाखो पर्यटक येत असून राजपुरी जेटी, खोरा बंदर, दिघी बंदरातून प्रवासी वाहतूक केली जाते. पर्यटकांना शिडाच्या बोटींतून प्रवासाने विशेष आनंद मिळत असल्‍याने याच बोटींना पसंती दिली जाते.

राजपुरी बंदरातून किल्‍ल्‍यावर प्रवासी वाहतुकीसाठी बारा वर्षांपर्यंत ५० रुपये तर १२ वर्षांवरील व्यक्‍तीस १०० रुपये आकारले जात असल्‍याची माहिती जंजिरा पर्यटक सहकारी संस्‍थेचे व्यवस्थापक नाझिम कादिरी यांनी दिली. या व्यतिरिक्त पुरातत्त्व विभागाकडून किल्ल्यात प्रवेश करतेवेळी १५ वर्षांपर्यंतच्या मुला-मुलींना शुल्क माफ असून १६ वर्षांवरील प्रति व्यक्तीस २५ रुपये आकारण्यात येत असल्‍याची माहिती सहाय्यक संवर्धक पुरातत्त्व विभाग अधिकारी बजरंग येलीकर यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *