माथेरान : आगामी विधानसभा निवडणूका त्याचप्रमाणे पुढील काळात नगरपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या शिवसेनेचे शहरप्रमुख चंद्रकांत चौधरी यांनी आतापासूनच पक्षाची बांधणी करण्यास सुरुवात केली असून आतापर्यंत विविध प्रभागातील कार्यकर्त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिलेले असून पुढेही अन्य पक्षातील कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत.

माथेरान मधील असामान्य नेतृत्व म्हणून चंद्रकांत चौधरी यांच्याकडे पाहिले जाते त्यातच युवा वर्गाचा देखील त्यांच्यावर विश्वास असून कार्यकर्त्यांची किंवा सर्वसामान्य लोकांची शासकीय अथवा निमशासकीय कामे हातोहात करून देण्यात चंद्रकांत चौधरी यांचा हातखंडा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी आपल्या पदाधिका-यांसह सज्ज झाले आहेत. लवकरच विविध प्रभागातील युवा वर्गाचे पक्षप्रवेश वरिष्ठांच्या उपस्थितीत केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

स्वतः चंद्रकांत चौधरी हे येथील विविध सांस्कृतिक, शैक्षणिक त्याचबरोबर एखाद्या संस्थेच्या कामांसाठी सढळ हाताने मदत करीत असतात. त्यामुळेच एक दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्या नावाची चर्चा केली जात आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिलेला असल्याने तरुण वर्ग त्यांच्या कामाच्या पद्धतीवर खुश दिसत आहे. त्यातूनही अन्य पक्षातील जे कोणी पक्षप्रवेश न करता नाहक जवळ येऊ पहात आहेत त्या बाबी पक्षातील कार्यकर्त्यांना रुचत नाहीत त्यांना दूर केल्यास निश्चितच पक्षात अजूनही वाढ होण्याची शक्यता असून पक्षातील सर्वच कार्यकर्त्यांना नेहमीच विश्वासात घेऊन आपल्या कामाला दिशा दिल्यास पक्षाला अधिक बळकटी येऊ शकते असे निष्ठावंत कार्यकर्त्यां कडून बोलले जात आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *