कुडाळ :’सत्कार हा व्यक्तीचा नसतो तर त्याच्या गुणांचा आणि केलेल्या कर्तृत्वाचा असतो आपण ज्या क्षेत्रामध्ये आहोत त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करणे आणि लोकांना न्याय मिळवून देणे महत्त्वाचे असते ‘ अशा शब्दात भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड संग्राम देसाई यांचा गौरव केला.
देसाई यांची बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी नुकतीच मुंबईत निवड झाली.यानिमित्ताने कुडाळ शहर वासियांतर्फे त्यांचा नागर सत्कार करण्यात आला.या सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना राणे म्हणाले, संग्राम देसाई यांनी माणसे जोडण्याचे काम केले आहे.लोकांना  न्याय मिळवून देण्यासाठी ते कशाप्रकारे लढतात हे मी पाहिले आहे. राणे यांच्या हस्ते यावेळी देसाई यांचा  मानपत्र तसेच स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला शिक्षण मंत्री दीपक केसरकर, माजी खासदार निलेश राणे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, कौन्सिलचे सदस्य ॲड जयंत जायभावे, ॲड गजानन चव्हाण, जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड परिमल नाईक, कुडाळ नगराध्यक्ष अक्षता खटावकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, गोव्याचे ॲड विवेक घाडगे, सत्कार समिती अध्यक्ष अमित सामंत, भाजपचे सरचिटणीस रणजीत देसाई तसेच जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड विवेक मांडकुलकर, काका कुडाळकर, अभय शिरसाट, धीरज परब, संतोष शिरसाट, गजानन कांदळगावकर, विजय प्रभू ,ॲड, अजित भणगे, ॲड. अमोल सामंत, ॲड.आनंद गवंडे तसेच सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राणे पुढे म्हणाले, मी जिल्ह्यात आलो तेव्हा माझी पहिली ओळख संग्राम यांचे वडील ॲड. डी . डी.देसाई यांच्याशी झाली त्यानंतर ॲड.संग्राम यांची ओळख झाली.एक सर्वसामान्य वकील ते आता महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलच्या अध्यक्ष पदा पर्यंतची त्यांची वाटचाल ही जिल्ह्यासाठी निश्चितच अभिमानास्पद आणि भूषणावह आहे.
यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरक,माजी खासदार निलेश राणे यांनी आपले मनोगत व्यक्त करून संग्राम देसाई यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड उमेश सावंत, सुत्रसंचलन सुमेधा नाईक, अविनाश वालावलकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *