कल्याण : शिधापत्रिकाधारकांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत रेशन दुकानात जाऊन ई-केवायसी करून घ्यावी, अन्यथा भविष्यात धान्य बंद होईल, असे आवाहन ३८ फ कल्याण प्रभारी शिधावाटप अधिकारी धरमसिंग बहुरे यांनी केले आहे. तसेच, पात्र शिधापत्रिकाधारकांनी आनंदाचा शिधा घेतला नसेल तर शिधावाटप दुकानातून तत्काळ घ्यावा. ज्या कुटुंबांतील व्यक्ती मयत झाल्या आहेत, त्यांचे नाव शिधापत्रिकेतून कमी करून घ्यावे. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड घेऊन शिधावाटप कार्यालयातील आपल्या संबंधित शिधावाटप निरीक्षकांशी संपर्क करावा, तसेच शिधापत्रिकेवर नाव कमी करणे, वाढवणे, नवीन शिधापत्रिका मिळवण्यासाठी कुठल्याही दलालाशी संपर्क करू नये. शिधापत्रिकेसंबंधित सर्व कामे ही कार्यालयीन खिडकीवरती निःशुल्क करून देण्यात येतात. त्यासाठी कुठल्याही दलालांना पैसे देऊन काम करून घेऊ नये, असे आवाहन बहुरे यांनी केले आहे.