मुंब्राः दूध डेअरी मध्ये लागलेल्या आगीत डेअरी मधील विविध प्रकारचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री दिव्यात घडली.
दिवा शहरातील साबे रोड जवळ असलेल्या १० बाय १५ फूट आकाराच्या गाळ्यामध्ये कैलास चंद्रकुमार यांची दूध डेअरी आहे. या डेअरी मध्ये मंगळवारी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. याबाबतची माहिती मिळताच मुंब्रा पोलीस ठाण्यातील कर्मचारी, वीज वितरण करणाऱ्या कंपनीचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी १ फायर ,१ रेस्क्यू वाहन आणि १ वॉटर टँकरच्या मदतीने दोन तासांच्या अथक प्रयत्नानी मध्यरात्री पावणेचार वाजण्याच्या सुमारास आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही. परंतु डेअरी मधील दुध ठेवण्याचे दोन मोठे आणि एक लहान फ्रिज तसेच इतर साहित्य जळून खाक झाल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली.