ठाणे – शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात `पोट्रेट कसे बनवावे’ याविषयी प्रख्यात पोट्रेट आर्टिस्ट अद्वैत नांदवडेकर यांची कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेत पोट्रेट बनवताना कशी काळजी घ्यावी, रंगसंगती कशाप्रकारे करावी, एखाद्या व्यक्तीचे चित्रण करत असताना त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव, रंगछटा सुबक रेषांनी रेखांकित करून त्यावर त्या व्यक्तीचे चित्रण करीत असतानाचे बारकावे इत्यादीबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रत्यक्षात रंगभरण करून छायाचित्र साकारले. माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सीमा हर्डीकर यांनी अद्वैत सरांनी आजपर्यंत केलेल्या विविध नामवंतांच्या पोट्रेट छायाचित्राचे कौतुक करत त्यांच्या कलेला दाद दिली. कलाशिक्षक योगेश पंडित यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून त्यांच्या या कलेचे अनुभव चित्र साकारत असताना त्यांना बोलते केले. त्यांनी साकारलेल्या आजपर्यंतच्या चित्रांचे अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडले. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन प्रत्यक्षात छायाचित्रांचा अनुभव घेतला.
