पनवेल : उरण विधानसभा क्षेत्रात सध्या राजकारण तापले आहे. शेतकरी कामगार पक्षाने नुकताच पदाधिकारी नियुक्ती मेळावा निमित्ताने युवाशक्तीला एकत्रित करून विधानसभा क्षेत्रात 300 पेक्षा जास्त युवा पदाधिकाऱ्यांची नियुक्ती भविष्यात येणाऱ्या विधानसभेत लाल बावटा फडकवण्यासाठी केली आहे.
माजी आमदार बाळाराम पाटील आणि माजी नगराध्यक्ष जे. एम म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या मेळाव्याला तालुक्यातून दोन हजार पेक्षा जास्त कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी शेतकरी कामगार पक्षाकडून उरणचे विधानसभेचे उमेदवार म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा खजिनदार प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. महाविकास आघाडी मधून आपल्यालाच तिकीट मिळेल असा विश्वास या मेळाव्यामध्ये नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला.
मेळाव्यानंतर दुसऱ्याच दिवशी संपूर्ण उरण विधानसभा क्षेत्रात युवा सपोर्ट म्हणून मोठ्या प्रमाणात बॅनर झळकले. परंतु ताबडतोब दुसऱ्याच दिवशी उरण नगर परिषदेच्या माध्यमातून ते काढण्यात आले. त्यामुळे नक्की यामागे कोण आहे?. इतर वेळी अनधिकृत होर्डिंग विरुद्ध शांत राहणाऱ्या उरण नगर परिषदेने याचवेळी होर्डिंग काढण्याचा कर्तव्यदक्षपणा दाखवल्यामुळे उरणकरांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.
