शैलेश तवटे

मुंबई हरियाणा विधानसभेत फक्त मंत्रिमंडळाचे खाते वाटप बाकी आहे, सत्तातर आमचीच येणार आहे इतक्या अतिआत्मविश्वास बाळगलेल्या काँग्रेसचे पुरते पाणीपत झाले. काँग्रेसच्या हरयाणातील हार वर महाराष्ट्रात त्यांचे सहकारी असणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने टायमिंग साधत प्रहार केले आहेत. लोकसभेतील निकालानंतर मोठ्याभावाच्या स्वयंघोषित भुमिकेत शिरलेल्या काँग्रेसला डिवचण्याची नामी संधी ठाकरेसेनेने साधलीय.

हरयाणातील पराभवामुळे महाराष्ट्रात सुरु असलेल्या महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चेतील काँग्रेसची वाटाघाटीची क्षमता कमी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दै. सामनातील अग्रलेखातून काँग्रेसला खडे बोल सुनावले आहेत. जिंकलेल्या डावाचे पराभवात रुपांतर कसं करायचं हे काँग्रेसकडून शिकायला हवे, अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली होती. एवढेच नव्हे तर काँग्रेसला स्वबळावर लढायचे असेल त्यांनी तशी भूमिका जाहीर करावी. जेणेकरुन इतर मित्रपक्ष आपला निर्णय घ्यायला मोकळे होतील, असेही संजय राऊत यांनी म्हटले.

संजय राऊत यांच्या या थेट आव्हानंतर काँग्रेसच्या गोटातून तीव्र प्रतिक्रिया उमटतील, असा अंदाज होता. मात्र काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेयांनी यावर सावध प्रतिक्रीया दिली. राऊत यांनी काय लिहीले आहे. त्यामागिल त्यांची भुमिका काय आहे हे त्यांच्याशी प्रत्यक्ष होणाऱ्या भेटीत जाणून घेऊ असे पटोले म्हणाले आहेत. पृथ्वीराज चव्हाण, भाई जगताप आणि वर्षा गायकवाड या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनाही यावर बोलणे टाळले आहे. या विषयावर आमचे प्रदेशाध्यक्ष बोलती, असे धोरण महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी स्वीकारले आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसचा पराभव दुर्दैवी आहे. जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीचा विजय झाला. हरियाणात इंडिया आघाडीतील पक्ष एकत्रपणे लढले असते तर फायदा झाला असता. पण काँग्रेसला वाटलं आम्ही एकतर्फी जिंकू, आम्हाला कोणाची गरज नाही. जिथे काँग्रेस दुबळी आहे, तिथे ते प्रादेशिक पक्षांची मदत घेते. जिथे काँग्रेसला आपण मजबूत आहोत असे वाटते, तिकडे ते प्रादेशिक पक्षांना महत्त्व देत नाहीत. नाहीतर हरियाणात भाजपचा विजय होईल, असे सांगणारा एकही व्यक्ती मला भेटला नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *