भारत आणि चीनमधील वाटाघाटी यशस्वी होत असल्याचे वृत्त अलिकडेच पुढे आले. न्यूयॉर्कमध्ये तसेच चीनमधूनही सीमेवर चीन माघार घेत असल्याचे सांगण्यात आले. मात्र गलवान खोऱ्यातून चीन माघार घेत असल्याचे सांगितले जात असले, तरी वस्तुस्थिती तशी नाही. दहा पावले पुढे येणे आणि दोन पावले मागे जाणे म्हणजे माघार नव्हे. चीनवर विश्वास ठेवणे धोकादायक असल्याने आपल्याला दूरगामी नीती अवलंबावी लागेल.
गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनमधील वाटाघाटी यशस्वी होत असल्याचे सांगितले जाते. न्यूयॉर्कमध्ये तसेच चीनमधूनही सीमेवर चीन माघार घेत असल्याचे सांगण्यात आले. भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही तसेच सांगितले; परंतु चीनवर विश्वास ठेवणे धोकादायक आहे. चीन हा जगातला सर्वात मोठा विश्वासघातकी देश आहे. चीनच्या सीमा 14 देशांशी लागून असून सर्वच देशांशी त्याचा सीमावाद आहे. चीन काही जमीन बळकावतो, अतिक्रमण करतो, तेव्हा ते माघार घेण्यासाठी नसते, हे प्रथम लक्षात घेतले पाहिजे. भारतीय राजकारणी, परराष्ट्र मंत्रालय आणि आपल्या लष्करानेही चीनचा पूर्वानुभव लक्षात घेऊन तशी धोरणे आखली पाहिजेत. भारत आणि चीनमध्ये १९६२ मध्ये युद्ध झाले. तेव्हापासून चीनचा वारंवार आलेला अनुभव लक्षात घेतला, तर चीन सातत्याने खोटे बोलतो, याची प्रचिती आली आहे. चीनने भारताच्या मोठ्या भागावर कब्जा केला आहे. चार वर्षांपूर्वी चीनने गलवान खोऱ्यात घुसखोरी केली. मोठी चकमक झाली. भारतीय सैन्याने तीव्र प्रतिकार केल्यामुळे आणि त्यात मोठ्या प्रमाणात सैनिक ठार झाल्याने चीनने काहीशी माघार घेतली. याचा अर्थ त्यांनी या भागावरचा कब्जा सोडला, असा नाही. चीनने गलवान खोऱ्यातून माघार घेतली, असे आता जे सांगितले जात आहे, त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. चीन गलवान खोऱ्यात कशासाठी आला, या प्रश्नाचे उत्तर शोधल्याशिवाय आपल्याला या प्रश्नाच्या मुळापर्यंत जाता येत नाही. गलवान खोऱ्यात भारताने तीव्र प्रतिकार केला नसता, तर कदाचित चीन या परिसरात मुसंडी मारून हा भाग गिळंकृत केला असता. त्यामुळे पाकिस्तानला जाण्याचा त्याचा मार्ग आणखी मोकळा झाला असता.
चीन काराकोरम खिंडीतून उत्तर भारतात ‘चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर’ (सीईपीसी) बांधत आहे. काराकोरम खिंडीजवळून हा मार्ग जातो. या मार्गावर भारत कब्जा करू शकतो, अशी भीती चीनला सातत्याने वाटते आहे. त्यामुळेच चीनने गलवान खोऱ्यात चकमक घडून आणली. सियाचीन ग्लेशियर हा भाग भारताप्रमाणेच पाकिस्तानसाठीही महत्त्वाचा आहे. गलवानच्या जागेवर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिल्यामुळे चीन थोडा मागे जाऊन थांबला. गेली चार वर्षे आपण चीनबरोबर वाटाघाटी करत आहोत. बैठका घेत आहोत; परंतु अजूनही चीनने माघार घेतलेली नाही. आता चीन मागे जायला तयार असल्याचे सांगितले जात असले तरी तो कुठपर्यंत मागे जाणार हे तपासून पाहिले पाहिजे. गलवान खोऱ्यात आक्रमण करण्यापूर्वी चीन ज्या ठिकाणी होता, तिथे परत जाणार का, या प्रश्नाचे उत्तर मिळाल्याशिवाय चीनच्या माघारीचे इंगित आपल्याला समजू शकणार नाही. युद्धशास्त्राचे काही नियम आहेत. त्यात राजनीती, कुटनीती, रणनीती या तीनही नीतींनी आपल्याला काम करणे आवश्यक आहे. सध्या भारत आणि चीनमध्ये चालू असलेल्या वाटाघाटींबद्दल इकडचे आणि तिकडचे काही लोक ज्या पद्धतीने बोलत आहेत, त्यावर विश्वास ठेवला तर ती आपली आत्महत्या ठरेल.
आता चीन मागे जाणार असल्याचे सांगितले जात असले, तरी तो मागे जाऊन जाऊन जाणार कुठे हे तपासले पाहिजे. तीन-चार किलोमीटर मागे जाऊन पुन्हा पुढे येण्याची तयारी तर तो करत नाही ना, यावर लक्ष ठेवले पाहिजे. चीनने गलवान खोऱ्यात आक्रमण केले, तेव्हा सध्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हेच संरक्षण मंत्री होते. त्यांनी त्या वेळच्या लष्करप्रमुखांना बोलवून चुशूल पर्वतावर आपले सैन्य ठेवून रिझान या जागेवर कब्जा करा, असे सांगितले. भारतीय सैन्याने संरक्षणाच्या आदेशाप्रमाणे या भागाचा कब्जा केला, तेव्हा चीनचे सैन्य सामान सोडून पळाले होते. यातून आपण एक धडा घेतला पाहिजे. तो म्हणजे चीनशी सामना करायचा असेल, तर अशा जागेवर आपला कब्जा असायला हवा, ज्यामुळे आपल्याला चीनचा धोका वाढणार नाही; परंतु दुर्भाग्याने आपण ते करू शकलो नाही. आपण नुसत्या वार्तालापामध्ये रममाण झालो आहोत.
चीन परतीबद्दल वारंवार सांगत असला, तरी तो किती मागे गेला हे कुणी पाहिले आहे का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे आहे. गलवान खोऱ्यात आक्रमण करण्यापूर्वी चीन नेमका कुठे होता आणि सध्या कुठे आहे आणि माघार घेतल्यानंतर तो कुठे असेल या प्रश्नांची उत्तरे शोधली तरच आपल्याला चीनच्या माघारीचा अर्थ उमगू शकेल. म्हणूनच आजघडीला तरी चीन मागे गेला, या म्हणण्याला सध्या तरी तसा काही अर्थ नाही आणि त्याची कथने वस्तुस्थितीला धरून नाहीत. चीन हा विश्वास ठेवण्याच्या लायकीचा देश नाही. चीनला 14 राष्ट्रांच्या सीमा लागून आहेत. त्यापैकी एकही राष्ट्र असे नाही, ज्याचे चीनशी वाद नाहीत. मांचुरिया, मंगोलिया, तैवान, हाँगकाँग अशा राष्ट्रांची उदाहरणे घेतली, तर आपल्याला चीनची आक्रमक वृत्ती आणि त्यांनी अन्य ठिकाणी बळकवलेली जमीन याची खात्री पटू शकेल. हीच स्थिती भारताबाबतही आहे. भारत शक्तीशाली होऊन दोन हात करणार नाही, तोपर्यंत चीन माघार घेणार नाही हे वास्तव आहे. टेबलावरच्या वाटाघाटी या केवळ वेळ काढण्यासाठी आहेत. त्यातून प्रत्यक्षात हाती काही लागत नाही. जिथे बर्फ पडतो आणि उणे तीस अंशापेक्षा जास्त थंडी असते, तिथे आपले सैन्य लढत असते आणि आपण इकडे वातानुकूलित दालनात बसून चीनच्या माघारीची चर्चा करत असतो. यातला फरक लक्षात घेतला पाहिजे. गेल्या चार वर्षात चीनने भारताच्या भूमीलगत भूमिगत लष्करी तळ, हवाई अड्डे बनवले आहेत. हे काही माघार घेण्यासाठी आहेत का, याचे उत्तर ‘नाही’ असे आहे. त्यामुळे भारताने गाफील राहून चालणार नाही. रशिया हा चीनचा अतिशय जवळचा मित्र असतानाही त्याची पाच हजार आठशे वर्ग किलोमीटर जमीन चीनच्या ताब्यात आहे, तर भारताची 32 हजार वर्ग किलोमीटर जमीन चीनने गिळंकृत केली आहे. उत्तराखंड, अरुणाचल प्रदेश येथिल सीमांवर चीनने घुसखोरी केली आहे. भारताच्या उत्तर सीमेवर कब्जा केला आहे. नेपाळच्या सीमेवर चीन आला आहे. तिथेही अतिक्रमण सुरू आहे. भूतान हे भारताचे मित्र राष्ट्र आहे. त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्यावर आहे. मात्र तिथेही चीनने घुसखोरी करून भारतावर दबाव टाकायला सुरुवात केली आहे. डोकलाम हे त्याचे उदाहरण. पाकिस्तानबरोबर संबंध नीट ठेवा, अशी एक प्रकारची धमकी चीन आपल्याला देत आहे. पाकिस्तानबरोबर आपले संबंध नीट राहणार नाहीत हे जगजाहीर आहे. बलुचिस्तानमध्ये चीनने ग्वादर बंदर उभारले आहे. तिथून चीनची मोठ्या प्रमाणात आयात निर्यात होते. काराकोरम आणि गलवान ताब्यात घेतले तर पाकिस्तानला जाण्याचा मार्ग आणखी मोकळा होईल, असे चीनला वाटते. त्यामुळे चीन कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. परिणामी, आपण चीनशी दोन हात करण्याची तयारी कायम ठेवली पाहिजे. ‘चीन रिस्पेक्ट पॉवर’ अशा अर्थाची एक म्हण आहे. या म्हणीचा अर्थ लक्षात घेऊन चीन शक्तीशाली राष्ट्रांचाच आदर करतो, असे गृहीत धरून आपण आपण आपली दूरगामी नीती अवलंबली पाहिजे. चोख आणि मुत्सद्दी पावले उचलूनच आपण चीनला उत्तर देऊ शकतो.
