मर्जिया पठाण यांनी दिला मानवतेचा धडा

ठाणे : आज माणसे एवढी निग्गरगट् झाली आहेत की शेजारील माणूस वेदनेने तळमळत असतानाही ढुंकूनही पहात नाहीत  मात्र  मुंब्रा येथील सामाजिक कार्यकर्त्या मर्जिया शानू पठाण यांनी रस्त्यावर वेदनेने तळमळणाऱ्या गर्भवतीला ओळखपाळख नसतानाही उचलून रूग्णालयात दाखल केले अन् तिचे बाळंतपण केले. मर्जिया यांच्या या मानवतावादी दृष्टिकोनाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

मुंब्रा येथे राहणारी रोशनी काळे ही गर्भवती महिला मित्तल रोड परिसरात काही कामानिमित्त आली होती. मात्र अचानक तिला प्रसूतीवेदना सुरू झाल्या. प्रचंड वेदना होऊ लागल्याने रोशनी रस्त्यावर पडली मात्र आजूबाजूला कोणीही मदतीसाठी धाऊन गेले नाही. त्याचवेळेस आपल्या अमृतनगर येथील कार्यालयात बसलेल्या मर्जिया शानू पठाण यांना ही माहिती मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट मित्तल रोड गाठले. तिथे पोहचताच मर्जिया पठाण यांनी आधी रोशनी यांना धीर दिला. स्वतः गाडीमध्ये उचलून बसविण्याचा प्रयत्न केला. मात्र वेदनेमुळे रोशनी हिस गाडीत बसणे अशक्य होत असल्याने एक रिक्षा थांबवून त्यातून रोशनी हिला कौसा रूग्णालयात दाखल केले. डाॅक्टरांना पाचारण करून रोशनी हिचे बाळंतपण केले. रोशनी हिला पुत्ररत्नाचा लाभ झाला असून मुलीचे वडील कस्तूर यांच्या विनंतीवरून मर्जिया यांनी मुलाचे शिवा असे नामकरण केले आहे.

दरम्यान, डोक्यावर सूर्य आग ओकत असल्याने आणखी उशीर झाला असता तर गर्भवती महिला आणि तिच्या बाळाच्या जीवावर बेतले असते. मात्र, मर्जिया पठाण यांनी प्रसंगावधान दाखविल्यामुळेच रोशनी आणि तिच्या मुलाचे प्राण वाचले असे डाॅक्टरांनी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *